Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ षष्ठोऽध्यायः ॥

॥ अध्याय सहावा - बुद्धियोगः ॥


श्रीगजानन उवाच -
ईदृशं विद्धि मे तत्त्वं मद्‌गतेनान्तरात्मना ।
यज्ज्ञात्वा मामसन्दिग्धं वेत्सि मोक्ष्यसि सर्वगम् ॥ १ ॥
श्रीगजानन म्हणाले , माझ्या ठिकाणीं अंतःकरण लावून माझे तत्त्व [यथार्थ स्वरूप] अशा प्रकारे जाण की, जे जाणल्याने सर्वव्यापी मला तू संशयरहित रीतीने जाणशील आणि मुक्त होशील. १.

तत्तेऽहं शृणु वक्ष्यामि लोकानां हितकाम्यया ।
अस्ति ज्ञेयं यतो नान्यन्मुक्तेश्च साधनं नृप ॥ २ ॥
हे नृपा, लोकांच्या हिताच्या इच्छेने मी ते तुला सांगतों. ऐक, जाणण्याला योग्य असे व मुक्तीचे साधन असे त्याहून दुसरें कांहीं नाहीं. २.

ज्ञेया मत्प्रकृतिः पूर्वं ततः स्यां ज्ञानगोचरः ।
ततो विज्ञानसम्पत्तिर्मयि ज्ञाते नृणां भवेत् ॥ ३ ॥
अगोदर माझी माया [प्रकृति] जाणावी. नंतर मला जाणावें म्ह० मी ज्ञानाचा विषय व्हावें. नंतर माझे ज्ञान झाल्यावर त्या मनुष्याला अनुभवयुक्त ज्ञानरूपी संपत्ति प्राप्त होते. ३.

क्वनलौ खमहङ्‌कारः कं चित्तं धीसमीरणौ ।
रवीन्दू यागकृच्चैकादशधा प्रकृतिर्मम ॥ ४ ॥
पृथ्वी, अग्नि, आकाश, अहंकार, उदक, चित्त, बुद्धि, वायु, सूर्य, चंद्र आणि यज्ञ करणारा यजमान अशी अकरा प्रकारची माझी माया आहे. ४.

अन्यां मत्प्रकृतिं वृद्धा मुनयः संगिरन्ति च ।
तथा त्रिविष्टपं व्याप्तं जीवत्वं गतयानया ॥ ५ ॥
ज्ञानाने वृद्ध असलेले मुनि माझी दुसरी श्रेष्ठ माया आहे असे सांगतात. जीवभाव प्राप्त झालेल्या या मायेने त्रैलोक्य व्यापिलें आहे. ५.

आभ्यामुत्पाद्यते सर्वं चराचरमयं जगत् ।
संगाद्विश्वस्य संभूतिः परित्राणं लयोऽप्यहम् ॥ ६ ॥
सर्व चराचरमय जग या दोन माया उत्पन्न करतात. यांच्या संगाने होणारी विश्वाची उत्पत्ति, पालन व लय हीं मी आहें. ६.

तत्त्वमेतन्निबोद्धुं मे यतते कश्चिदेव हि ।
वर्णाश्रमवतां पुंसां पुरा चीर्णेन कर्मणा ॥ ७ ॥
वर्णाश्रमधर्मी मनुष्यांपैकीं पूर्वी [= पूर्वजन्मीं] केलेल्या [चीर्णेन] कर्माचे योगाने एखादाच हे माझे तत्त्व जाणण्याचा यत्न करतो. ७.

साक्षात्करोति मां कश्चिद्यत्नवत्स्वपि तेषु च ।
मत्तोऽन्यन्नेक्षते किंचिन्मयि सर्वं च वीक्षते ॥ ८ ॥
त्या यत्न करणार्‍यांपैकी एखाद्यालाच माझा साक्षात्कार होतो. तो माझ्याहून वेगळे कांहीं आहे असे पहात नाही. सर्व माझ्या ठिकाणी आहे असे पहातो. ८.

क्षितौ सुगन्धरूपेण तेजोरूपेण चाग्निषु ।
प्रभारूपेण पूष्ण्यब्जे रसरूपेण चाप्सु च ॥ ९ ॥
धीतपोबलिनां चाहं धीस्तपोबलमेव च ।
त्रिविधेषु विकारेषु मदुत्पन्नेष्वहं स्थितः ॥ १० ॥
पृथ्वीमध्ये सुगंधरूपानें, अग्नीमध्यें तेजोरूपानें, सूर्यामध्ये प्रभारूपाने, उदक व चंद्र यांचेमध्ये रसरूपानें, बुद्धिवानांमधील बुद्धि, तपस्व्यांमधील तप, बलवानांमधील बल, अशा तर्‍हेने माझ्यापासून उत्पन्न झालेल्या उत्पत्ति, स्थिति व लय या तिन्ही विकारांचे ठिकाणीं मी स्थित आहे ९-१०.

न मां विन्दति पापीयान्मायामोहितचेतनः ।
त्रिविकारा मोहयति प्रकृतिर्मे जगत्त्रयम् ॥ ११ ॥
मायेने चित्त मोहित झालेल्या पाप्याला मी प्राप्त होत नाहीं. तीन विकारांनी युक्त अंशी माझी माया त्रैलोक्याला मोह पाडते. ११.

यो मे तत्त्वं विजानाति मोहं त्यजति सोऽखिलम् ।
अनेकैर्जन्मभिश्चैवं ज्ञात्वा मां मुच्यते ततः ॥ १२ ॥
जो माझे तत्त्व जाणतो तो सर्व मोहाचा त्याग करतो. नंतर अनेक जन्मांनी या प्रकारे मला पूर्णपणे जाणून तो मुक्त होतो. १२.

अन्ये नानाविधान्देवान्भजन्ते तान्व्रजन्ति ते ।
यथा यथा मतिं कृत्वा भजते मां जनोऽखिलः ॥ १३ ॥
तथा तथास्य तं भावं पूरयाम्यहमेव तम् ।
अहं सर्वं विजानामि मां न कश्चिद्विबुध्यते ॥ १४ ॥
दुसरे लोक नानाप्रकारच्या देवांची भक्ति करतात व त्या देवांप्रत ते जातात. ज्या ज्या प्रकारची बुद्धि करून सर्व लोक माझी भक्ति करतात त्या त्या प्रकारे त्यांचा तो तो भाव अथवा इच्छा मी पूर्ण करतो. मी सर्व जाणतों. मला कोणी जाणत नाहीं. १३-१४.

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं न विदुः काममोहिताः ।
नाहं प्रकाशतां यामि अज्ञानां पापकर्मणाम् ॥ १५ ॥
अव्यक्त असून व्यक्त स्वरूप प्राप्त झालेल्या मला कामाने [ म्ह० कामादि शत्रूंनीं ] मोहित झालेले मनुष्य जाणत नाहींत. अज्ञ व पापकर्मी मनुष्यांना माझे ज्ञान होत नाहीं. १५.

यः स्मृत्वा त्यजति प्राणमन्ते मां श्रद्धयान्वितः ।
स यात्यपुनरावृत्तिं प्रसादान्मम भूभुज ॥ १६ ॥
हे राजा, श्रद्धेने युक्त होत्साता जो अन्तकालीं माझें स्मरण करून प्राणाचा त्याग करतो तो माझ्या कृपेने अपुनर्जन्माप्रत जातो म्ह० पुन्हा जन्म पावत नाहीं. १६.

यं यं देवं स्मरन्भक्त्या त्यजति स्वं कलेवरम् ।
तत्तत्सालोक्यमायाति तत्तद्‌भक्त्या नराधिप ॥ १७ ॥
हे राजा, ज्या ज्या देवाचे भक्तिपूर्वक स्मरण करून मनुष्य आपल्या देहाचा त्याग करतो तो त्या त्या देवाच्या भक्तीने त्या त्या देवाच्या लोकाप्रत जातो. १७.

अतश्चाहर्निशं भूप स्मर्तव्योऽनेकरूपवान् ।
सर्वेषामप्यहं गम्यः स्रोतसामर्णवो यथा ॥ १८ ॥
हे राजा, म्हणून अनेक रूपें धारण करणार्‍या माझे अहर्निश स्मरण करावे, जसा समुद्र सर्वांना गम्य आहे त्याप्रमाणे मी सर्वांना गम्य आहे. १८.

ब्रह्मविष्णुशिवेन्द्राद्याँल्लोकान्प्राप्य पुनः पतेत् ।
यो मामुपैत्यसंदिग्धः पतनं तस्य न क्वचित् ॥ १९ ॥
ब्रह्मदेव, विष्णु, शिव, इंद्र इत्यादिकांच्या लोकांना गेल्यानंतर मनुष्य कालान्तराने पुनः पुण्यक्षयानंतर मृत्युलोकीं पतन पावतो. पण जो संशयरहित होत्साता मजप्रत येतो त्याला कोठेहि पतन नाहीं. १९.

अनन्यशरणो यो मां भक्त्या भजति भूमिप ।
योगक्षेमौ च तस्याहं सर्वदा प्रतिपादये ॥ २० ॥
हे राजा, जो अनन्यशरण होत्साता माझी भक्तिपूर्वक भक्ति करतो त्याचा योग [=अप्राप्त वस्तूंची प्राप्ति ] व क्षेम [ =प्राप्त वस्तूचें रक्षण ] मी करतों. २०.

द्विविधा गतिरुद्दिष्टा शुक्ला कृष्णा नृणां नृप ।
एकया परमं ब्रह्म परया याति संसृतिम् ॥ २१ ॥
हे राजा, मनुष्यांची गति शुक्ल [ =ज्ञानरूप] व कृष्ण [=अज्ञानरूप ] अशी दोन प्रकारची सांगितलेली आहे. एकीने अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्माला पावतो व दुसरीने संसाराला पावतो. २१.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे
बुद्धियोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥
बुद्धियोग नामक सहावा अध्याय समाप्त ॥ ६ ॥


॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )