Gurudev

Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ चतुर्थोऽध्यायः ॥

॥ अध्याय चौथा - वैधसंन्यासयोग ॥


वरेण्य उवाच -
संन्यस्तिश्चैव योगश्च कर्मणां वर्ण्यते त्वया ।
उभयोर्निश्चितं त्वेकं श्रेयो यद्वद मे प्रभो ॥ १ ॥
वरेण्य म्हणाले , हे प्रभो, कर्मांचा संन्यास आणि कर्मांचा योग या दोहोचें तूं वर्णन केलेस.या दोहोंपैकी जो निश्चित श्रेयस्कर असेल तो मला सांग.१

श्रीगजानन उवाच - क्रियायोगो वियोगश्चाप्युभौ मोक्षस्य साधने ।
तयोर्मध्ये क्रियायोगस्त्यागात्तस्य विशिष्यते ॥ २ ॥
श्रीगजानन म्हणाले , कर्माचा योग आणि कर्माचा संन्यास हे दोन्ही मोक्षाचे साधन आहेत.त्यांमध्ये कर्माच्या त्यागापेक्षां कर्माचा योग विशेष अथवा अधिक श्रेयस्कर आहे.२.

द्वन्द्वदुःखसहोऽद्वेष्टा यो न काङ्‌क्षति किंचन ।
मुच्यते बन्धनात्सद्यो नित्यं संन्यासवान्सुखम् ॥ ३ ॥
शीत-उष्ण, जन्म-मृत्यु इत्यादि द्वंद्वरूपी दुःखें सहन करणारा, त्यांचा द्वेष न करणारा असा जो मनुष्य कशाचीहि आकांक्षा धरीत नाहीं तो नित्य सुखाने असणारा संन्यासी तत्काल बंधनापासून मुक्त होतो.३.

वदन्ति भिन्नफलकौ कर्मणस्त्यागसंग्रहौ ।
मूढाल्पज्ञास्तयोरेकं संयुञ्जीत विचक्षणः ॥ ४ ॥
कर्मत्याग व कर्मयोग हे भिन्न फलें देणारे आहेत असे मूर्ख व अल्पज्ञ म्हणतात.शहाण्या मनुष्याने त्यांपैकी एकाचा योग करावा.४ .

यदेव प्राप्यते त्यागात्तदेव योगतः फलम् ।
संग्रहं कर्मणो योगं यो विन्दति स विन्दति ॥ ५ ॥
त्यागापासून जे प्राप्त होते तेंच फल कर्माच्या योगापासून मिळते. कर्माचा संग्रह हाच योग होय; हा ज्याला प्राप्त होतो त्याला प्राप्तव्य=ब्रह्म प्राप्त होते. ५.

केवलं कर्मणां न्यासं संन्यासं न विदुर्बुधाः ।
कुर्वन्ननिच्छया कर्म योगी ब्रह्मैव जायते ॥ ६ ॥
कर्मांचा केवळ त्याग म्हणजे संन्यास नव्हे असे ज्ञाते जाणतात. पण इच्छारहित कर्म करणारा योगी ब्रह्मच होतो. ६.

निर्मलो यतचित्तात्मा जितखो योगतत्परः ।
आत्मानं सर्वभूतस्थं पश्यन्कुर्वन्न लिप्यते ॥ ७ ॥
निर्मल [=शुद्ध, पापरहित], चित्त व आत्मा जिंकलेला, इंद्रिये जिंकलेला, योगतत्पर आणि आपलाच आत्मा सर्व भूतांचे ठिकाणीं आहे असे पहाणारा कर्म करीत असला तरी त्यानें लिप्त होत नाहीं. ७.

तत्त्वविद्योगयुक्तात्मा करोमीति न मन्यते ।
एकादशानीन्द्रियाणि कुर्वन्ति कर्मसंख्यया ॥ ८ ॥
तत्त्ववेत्ता आणि योगाचे ठिकाण मन युक्त असलेला योगी 'मी कर्म करतो' असे मानीत नाहीं; एकादश इंद्रिये संख्येने तितकींच म्हणजे एकादश कर्मे करतात असे तो जाणतो. ८.

तत्सर्वमर्पयेद्‌ब्रह्मण्यपि कर्म करोति यः ।
न लिप्यते पुण्यपापैर्भानुर्जलगतो यथा ॥ ९ ॥
जो योगी जें कर्म करतो ते सर्व ब्रह्माला अर्पण करतो तो त्या कर्माचे पुण्य अथवा पाप यांनीं लिप्त होत नाहीं. जलामध्ये प्रतिबिंबित असलेला सूर्य ज्याप्रमाणे जलानें लिप्त होत नाहीं तद्वत्.९.

कायिकं वाचिकं बौद्धमैन्द्रियं मानसं तथा ।
त्यक्त्वाशां कर्म कुर्वन्ति योगज्ञाश्चित्तशुद्धये ॥ १० ॥
योगज्ञानी चित्तशुद्धीकरितां कायिक, वाचिक, बुद्धिविषयक, इंद्रियविषयक व मानसिक कर्म फलाची आशा सोडून करतात. १०.

योगहीनो नरः कर्म फलेहया करोत्यलम् ।
बध्यते कर्मबीजैः स ततो दुःखं समश्नुते ॥ ११ ॥
योगज्ञानहीन मनुष्य फलाच्या इच्छेने पुष्कळ कर्म करतो. तो कर्माच्या बीजानें म्ह० फलेच्छेने बद्ध होतो व त्यापासून दुःख पावतो. ११.

मनसा सकलं कर्म त्यक्त्वा योगी सुखं वसेत् ।
न कुर्वन्कारयन्वापि नन्दन्श्वभ्रे सुपत्तने ॥ १२ ॥
योगी मनाने सर्व कर्मांचा त्याग करून कांहीं न करतां अथवा कांहीं न करवितां गुहेमध्ये अथवा मोठ्या नगरामध्ये आनंदयुक्त होत्साता सुखाने रहातो.१२.

न क्रिया न च कर्तृत्वं कस्य चित्सृज्यते मया ।
न क्रियाबीजसंपर्कः शक्त्या तत्क्रियतेऽखिलम् ॥ १३ ॥
कोणाचे कर्म अथवा कोणाच्या कर्माचे कर्तृत्व अथवा कोणाच्या कर्मबीजाचा [फलेच्छेचा किंवा वासनेचा] संबंध देखील मी उत्पन्न करीत नाही. हे सर्व माया करते. १३.

कस्यचित्पुण्यपापानि न स्पृशामि विभुर्नृप ।
ज्ञानमूढा विमुह्यन्ते मोहेनावृतबुद्धयः ॥ १४ ॥
हे नृपा, मी सर्वव्यापी आहे तरी कोणाच्याहि पुण्याला अथवा पापाला स्पर्श करीत नाहीं. मोहाने बुद्धि आच्छादित झालेले ज्ञानहीन लोक मोह पावतात. १४.

विवेकेनात्मनोऽज्ञानं येषां नाशितमात्मना ।
तेषां विकाशमायाति ज्ञानमादित्यवत्परम् ॥ १५ ॥
ज्यांचे आत्म्याविषयींचे अज्ञान विवेकानें आणि आत्मज्ञानानें [आत्मना] नाश पावलेले आहे त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ [परं] ज्ञान सूर्याप्रमाणे विकास पावते. १५.

मन्निष्ठा मद्धियोऽत्यन्तं मच्चित्ता मयि तत्पराः ।
अपुनर्भवमायान्ति विज्ञानान्नाशितैनसः ॥ १६ ॥
माझ्या ठिकाणी निष्ठा असलेले, माझ्या ठिकाणी बुद्धि असलेले, माझ्या ठिकाणी अत्यंत चित्त असलेले व माझ्या ठिकाणी तत्पर असलेले, अनुभवयुक्त ज्ञानानें पापाचा नाश झाल्यावर पुनः जन्म पावत नाहींत.१६.

ज्ञानविज्ञानसंयुक्ते द्विजे गवि गजादिषु ।
समेक्षणा महात्मानः पण्डिताः श्वपचे शुनि ॥ १७ ॥
ज्ञान व विज्ञान यांनी युक्त ब्राम्हण, गाय, हत्ती इत्यादि प्राणी, चांडाल अथवा श्वान यांचे ठिकाणी महात्म्या पंडितांची दृष्टि समान असते.१७.

वश्यः स्वर्गो जगत्तेषां जीवन्मुक्ताः समेक्षणाः ।
यतोऽदोषं ब्रह्म समं तस्मात्तैर्विषयीकृतम् ॥ १८ ॥
स्वर्ग आणि जग त्यांना वश असते, समान दृष्टि ठेवणारे ते जीवन्मुक्त होत. कारण, दोषरहित व समान असे ब्रह्म त्यांनी आपल्या ज्ञानाचा विषय केलेले असते म्हणून.१८.

प्रियाप्रिये प्राप्य हर्षद्वेषौ ये प्राप्नुवन्ति न ।
ब्रह्माश्रिता असंमूढा ब्रह्मज्ञाः समबुद्धयः ॥ १९ ॥
प्रिय अथवा अप्रिय प्राप्त झाली असतां जे हर्ष अथवा दुःख पावत नाहींत, जे ब्रह्माचा आश्रय करतात, मोहरहित व सर्वत्र समान बुद्धि ठेवणारे असतात ते ब्रह्मज्ञ होत.१९.

वरेण्य उवाच - किं सुखं त्रिषु लोकेषु देवगन्धर्वयोनिषु ।
भगवन्कृपया तन्मे वद विद्याविशारद ॥ २० ॥
वरेण्य म्हणाले , हे विद्याविशारदा भगवंता, त्रैलोक्यामध्ये आणि देवगंधर्वादि योनींमध्ये खरें सुख कोणते ते मला कृपा करून सांग.२०.

श्रीगजानन उवाच - आनन्दमश्नुतेऽसक्तः स्वात्मारामो निजात्मनि ।
अविनाशि सुखं तद्धि न सुखं विषयादिषु ॥ २१ ॥
श्रीगजानन म्हणाले , आसाक्तिरहित असलेला मनुष्य स्वतःचे आत्म्याचे ठिकाणीं आराम पावतो, स्वतःचे आत्म्याचे ठिकाणी आनंद भोगतो. हें जें सुख ते शाश्वत सुख होय, विषयादिकांचे ठिकाणीं मिळणारे सुख शाश्वत नव्हे. २१.

विषयोत्थानि सौख्यानि दुःखानां तानि हेतवः ।
उत्पत्तिनाशयुक्तानि तत्रासक्तो न तत्त्ववित् ॥ २२ ॥
विषयांपासून उत्पन्न होणारी जी सुखें तीं दुःखांना कारण होत, ती उत्पत्ति व नाश यांनी युक्त आहेत. तत्त्ववेत्ता त्यांचे ठिकाणीं आसक्त नसतो.२२.

कारणे सति कामस्य क्रोधस्य सहते च यः ।
तौ जेतुं वर्ष्मविरहात्स सुखं चिरमश्नुते ॥ २३ ॥
काम, क्रोध इत्यादि विषयांचे कारण असतांहि जो देहबुद्धि टाकून [वर्ष्म=देह=देहबुद्धि=अहंकार ] त्यांना जिंकण्याला समर्थ होतो त्याला शाश्वत सुख प्राप्त होते. २३.

अन्तर्निष्ठोऽन्तःप्रकाशोऽन्तःसुखोऽन्तारतिर्लभेत् ।
असंदिग्धोऽक्षयं ब्रह्म सर्वभूतहितार्थकृत् ॥ २४ ॥
ज्याला अंतरात्म्यामध्ये निष्ठा, प्रकाश [ज्ञान], सुख आणि रति प्राप्त झालीं आहेत, जो संशयरहित झाला आहे वे जो सर्व भूतांचे हित करण्यांत गढून गेलेला आहे, तोच अविनाशी ब्रह्म पावतो. २४.

जेतारः षड्‌रिपूणां ये शमिनो दमिनस्तथा ।
तेषां समन्ततो ब्रह्म स्वात्मज्ञानां विभात्यहो ॥ २५ ॥
षड्‌‍रिपूंना जिंकणार्‍या, शम व दम यांनी युक्त असलेल्या अशा आत्मज्ञानी मनुष्यांच्या भोंवती सर्वत्र ब्रह्म प्रकाशते.२५.

आसनेषु समासीनस्त्यक्त्वेमान्विषयान्बहिः ।
संस्तभ्य भृकुटीमास्ते प्राणायामपरायणः ॥ २६ ॥
या शब्दस्पर्शादि विषयांना बाहेर टाकून योगाची आसनें योग्य प्रकारे करणारा [आसनांचे ठिकाणी चांगला स्थित असलेला ] प्राणायामतत्पर योगी भुवयांचा संकोच करून बसतो. २६.

प्राणायामं तु संरोधं प्राणापानसमुद्‌भवम् ।
वदन्ति मुनयस्तं च त्रिधाभूतं विपश्चितः ॥ २७ ॥
प्राण व अपान यांपासून उत्पन्न होणारा वायूचा निरोध हाच प्राणायाम होय. हा तीन प्रकारचा आहे असे ज्ञाते मुनि म्हणतात. २७.

प्रमाणं भेदतो विद्धि लघुमध्यममुत्तमम् ।
दशभिर्द्व्यधिकैर्वर्णैः प्राणायामो लघुः स्मृतः ॥ २८ ॥
लघु, मध्यम व उत्तम असे तीन प्रकारचे भेदाचे प्रमाण आहे असे जाण. बारा वर्णांनी [= अक्षरांनीं ] होणारा प्राणायाम 'लघु' होय असे म्हणतात.२८.

चतुर्विंशत्यक्षरो यो मध्यमः स उदाहृतः ।
षट्त्रिंशल्लघुवर्णो य उत्तमः सोऽभिधीयते ॥ २९ ॥
जो चोवीस अक्षरांचा प्राणायाम तो 'मध्यम' असे म्हणतात.छत्तीस र्‍हस्व अक्षरांचा प्राणायाम तो 'उत्तम' असे म्हणतात.२९.

सिंहं शार्दूलकं वापि मत्तेभं मृदुतां यथा ।
नयन्ति प्राणिनस्तद्वत्प्राणापानौ सुसाधयेत् ॥ ३० ॥
ज्याप्रमाणे मनुष्य [ प्राणिनः] सिंह, वाघ अथवा मत्त हत्ती यांना मऊ आणतात त्याप्रमाणे प्राण व अपान यांचे चांगले साधन करावें [=यांना ताब्यात आणावे ].३०.

पीडयन्ति मृगास्ते न लोकान्वश्यं गता नृप ।
दहत्येनस्तथा वायुः संस्तब्धो न च तत्तनुम् ॥ ३१ ॥
हे नृपा, ते वश झालेले पशु ज्याप्रमाणे लोकांना पीडा देत नाहीत त्याप्रमाणे ते वश झालेले प्राण व अपान लोकांना पीडा देत नाहींत.३१.

यथा यथा नरः कश्चित्सोपानावलिमाक्रमेत् ।
तथा तथा वशीकुर्यात्प्राणापानौ हि योगवित् ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जिन्याच्या पायर्‍या एकामागून एक क्रमानें चढून जातो त्याप्रमाणे प्राण व अपान यांना एकेक पायरीच्या क्रमानें योगज्ञ मनुष्याने वश करावे.३२.

पूरकं कुम्भकं चैव रेचकं च ततोऽभ्यसेत् ।
अतीतानागतज्ञानी ततः स्याज्जगतीतले ॥ ३३ ॥
नंतर पूरक, कुंभक आणि रेचक यांचा अभ्यास करावा, तेणेंकरून जगतीतलावर भूत व भविष्य हे जाणणारा असा तो होतो.३३.

प्राणायामैर्द्वादशभिरुत्तमैर्धारणा मता ।
योगस्तु धारणे द्वे स्याद्योगीशस्ते सदाभ्यसेत् ॥ ३४ ॥
बारा उत्तम प्राणायामांनीं एक धारणा होते असे मानले आहे.दोन धारणा म्हणजे योग होतो.योगीश्वरानें त्या दोन धारणांचा सर्वदा अभ्यास करावा.३४.

एवं यः कुरुते राजंस्त्रिकालज्ञः स जायते ।
अनायासेन तस्य स्याद्वश्यं लोकत्रयं नृप ॥ ३५ ॥
हे राजा, याप्रमाणे जो करतो तो त्रिकालज्ञानी होतो.हे नृपा, त्याला अनायासानें त्रैलोक्य वश होते.३५.

ब्रह्मरूपं जगत्सर्वं पश्यति स्वान्तरात्मनि ।
एवं योगश्च संन्यासः समानफलदायिनौ ॥ ३६ ॥
सर्व जग ब्रह्मरूप आहे व स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये आहे असे त्याला दिसते.या प्रकारे योग आणि संन्यास हे दोन्ही समान फल देणारे आहेत.३६.

जन्तूनां हितकर्तारं कर्मणां फलदायिनम् ।
मां ज्ञात्वा मुक्तिमाप्नोति त्रैलोक्यस्येश्वरं विभुम् ॥ ३७ ॥
सर्व प्राण्यांचे हित करणारा व कर्माचे फल देणारा, त्रैलोक्याचा ईश्वर व सर्वव्यापी जो मी त्या मला जाणल्यावर मनुष्याला मुक्ति प्राप्त होते.३७.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे
वैधसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥
वैधसंन्यासयोग नामक चौथा अध्याय समाप्त ॥



॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )