Gurudev

Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ तृतीयोऽध्यायः ॥

॥ अध्याय तिसरा - विज्ञानप्रतिपादन ॥


श्रीगजानन उवाच -
पुरा सर्गादिसमये त्रैगुण्यं त्रितनूरुहम् ।
निर्माय चैनमवदं विष्णवे योगमुत्तमम् ॥ १ ॥
श्रीगजानन म्हणाले , पूर्वी सृष्टीनिर्माणकालीं तीन प्रकारच्या शरीरांपासून उत्पन्न होणारे त्रैगुण्य [सत्त्व, रज व तम] उत्पन्न करून मी विष्णूला हा उत्तम योग सांगितला. १.

अर्यम्णे सोऽब्रवीत्सोऽपि मनवे निजसूनवे ।
ततः परम्परायातं विदुरेनं महर्षयः ॥ २ ॥
त्याने तो सूर्याला सांगितला, सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला, तेथून परंपरेने येत असलेला हा योग महर्षींनी जाणला. २.

कालेन बहुना चायं नष्टः स्याच्चरमे युगे ।
अश्रद्धेयो ह्यविश्वास्यो विगीतव्यश्च भूमिप ॥ ३ ॥
हे राजा, बहुत काळ लोटल्यानंतर शेवटच्या युगांत हा नष्ट होईल, यावर कोणाची श्रद्धा रहाणार नाहीं, विश्वास रहाणार नाही, हा निंदास्पद होईल. ३.

एवं पुरातनं योगं श्रुतवानसि मन्मुखात् ।
गुह्याद्गुह्यतरं वेदरहस्यं परमं शुभम् ॥ ४ ॥
अशा प्रकारचा पुरातन योग माझ्या मुखाने सांगितलेला तूं श्रवण केलास. हा योग गुह्याहून अधिक गुह्य आहे, वेदांचे रहस्य आहे, अत्यंत शुभ आहे. ४.

वरेण्य उवाच - सांप्रतं चावतीर्णोऽसि गर्भतस्त्वं गजानन ।
प्रोक्तवान्कथमेतं त्वं विष्णवे योगमुत्तमम् ॥ ५ ॥
वरेण्य म्हणाले , हे गजानना, तूं तर सांप्रत गर्भापासून उत्पन्न झाला आहेस; मग हा उत्तम योग पूर्वी तू विष्णूला कसा सांगितलास ? ५.

गणेश उवाच - अनेकानि च ते जन्मान्यतीतानि ममापि च ।
संस्मरे तानि सर्वाणि न स्मृतिस्तव वर्तते ॥ ६ ॥
गणेश म्हणाले , तुझे आणि माझे देखील अनेक जन्म होऊन गेले आहेत. ते सर्व मी स्मरतो, तुला त्यांचे स्मरण नाहीं. ६.

मत्त एव महाबाहो जाता विष्ण्वादयः सुराः ।
मय्येव च लयं यान्ति प्रलयेषु युगे युगे ॥ ७ ॥
हे महाबाहो, विष्णु आदिकरून देव माझ्यापासून उत्पन्न झाले, युगायुगाचे ठिकाणीं प्रलयकालीं माझ्यामध्येंच ते लय पावतात, ७.

अहमेव परो ब्रह्म महारुद्रोऽहमेव च ।
अहमेव जगत्सर्वं स्थावरं जङ्‌गमं च यत् ॥ ८ ॥
मीच पर [ श्रेष्ठ ] ब्रह्म आहे, महारुद्र मीच आहे, स्थावर व जंगम जे जग ते सर्व मी आहे. ८.

अजोऽव्ययोऽहं भूतात्माऽनादिरीश्वर एव च ।
आस्थाय त्रिगुणां मायां भवामि बहुयोनिषु ॥ ९ ॥
जन्मरहित, नाशरहित, सर्व भूतांचा आत्मा आणि अनादि कालापासून ईश्वर असा मी आहे. त्रिगुणात्मक मायेचा आश्रय करून नानाप्रकारच्या योनींचे ठिकाणीं मी जन्म घेतों. ९.

अधर्मोपचयो धर्मापचयो हि यदा भवेत् ।
साधून्संरक्षितुं दुष्टांस्ताडितुं संभवाम्यहम् ॥ १० ॥
अधमचा उत्कर्ष [उपचयः] व धर्माचा अपकर्ष [अपचयः] जेव्हा होतो तेव्हां साधूचे संरक्षण करण्याकरितां आणि दुष्टांचे शासन करण्याकरितां मी जन्म घेतों. १०.

उच्छिद्याधर्मनिचयं धर्मं संस्थापयामि च ।
हन्मि दुष्टांश्च दैत्यांश्च नानालीलाकरो मुदा ॥ ११ ॥
अधर्मसंग्रहाचा उच्छेद करून मी धर्माची संस्थापना करतो. नानाप्रकारच्या लीला करणारा मी हंसत खेळत दुष्टांचा व दैत्यांचा संहार करतों. ११.

वर्णाश्रमान्मुनीन्साधून्पालये बहुरूपधृक् ।
एवं यो वेत्ति संभूतीर्मम दिव्या युगे युगे ॥ १२ ॥
तत्तत्कर्म च वीर्यं च मम रूपं समासतः ।
त्यक्ताहंममताबुद्धिं न पुनर्भूः स जायते ॥ १३ ॥
बहुत रूपें धारण करणारा होऊन मी वर्ण, आश्रम मुनि व साधु यांचे पालन करतो. याप्रकारे युगायुगाचे ठिकाणीं होणारे माझे दिव्य जन्म जो जाणतो, माझी तीं तीं कमें, पराक्रम, सर्व प्रकारे [समासतः ] माझे स्वरूप ( जाणतो ), तो अहंकार आणि ममत्वबुद्धि यांचा त्याग करून पुन्हां जन्म पावत नाहीं अर्थात् पुन्हां जन्म पावणारा होत नाहीं. १२-१३.

निरीहा निर्भियोरोषा मत्परा मद्‌व्यपाश्रयाः ।
विज्ञानतपसा शुद्धा अनेके मामुपागताः ॥ १४ ॥
इच्छा, भय व क्रोध यांनी रहित असलेले, मत्परायण, माझा आश्रय केलेले, विज्ञानरूपी तपाने शुद्ध झालेले असे अनेक मजप्रत आले आहेत. १४.

येन येन हि भावेन संसेवन्ते नरोत्तमाः ।
तथा तथा फलं तेभ्यः प्रयच्छाम्यव्ययः स्फुटम् ॥ १५ ॥
नरश्रेष्ठ ज्या ज्या भावनेनें माझा आश्रय करतात त्या त्याप्रमाणे व्ययरहित मी त्यांना स्पष्ट फल देतो. १५.

जनाः स्युरितरे राजन्मम मार्गानुयायिनः ।
तथैव व्यवहारं ते स्वेषु चान्येषु कुर्वते ॥ १६ ॥
हे राजा, कोणीहि मनुष्य माझ्या मार्गानें वागणारे असोत, ते स्वतःच्या देवतेसंबंधानें व इतर देवतांसंबंधाने एकाच प्रकारचा व्यवहार करतात. १६.

कुर्वन्ति देवताप्रीतिं काङ्‌क्षन्तः कर्मणां फलम् ।
प्राप्नुवन्तीह ते लोके शीघ्रं सिद्धिं हि कर्मजाम् ॥ १७ ॥
कर्मांच्या फलाची आकांक्षा धरणारे देवतेला प्रिय असे कर्म आचरण करतात. ते या लोकीं कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धि अल्प काळांत पावतात. १७.

चत्वारो हि मया वर्णा रजःसत्त्वतमोंऽशतः ।
कर्मांशतश्च संसृष्टा मृत्युलोके मयानघ ॥ १८ ॥
हे पापरहिता, सत्व, रज व तम यांच्या अंशाने व कर्माच्या अंशाप्रमाणे या मृत्युलोकी चार वर्ण मी निर्माण केले. १८.

कर्तारमपि तेषां मामकर्तारं विदुर्बुधाः ।
अनादिमीश्वरं नित्यमलिप्तं कर्मजैर्गुणैः ॥ १९ ॥
निरीहं योऽभिजानाति कर्म बध्नाति नैव तम् ।
चक्रुः कर्माणि बुद्ध्यैवं पूर्वं पूर्वं मुमुक्षवः ॥ २० ॥
त्यांचा कर्ता असून मी अकर्ता, आहे असे ज्ञाते जाणतात. अनादि, ईश्वर, कर्मांपासून उत्पन्न होणार्‍या गुणांपासून सर्वदा अलिप्त, इच्छारहित अशा प्रकारें मला जो जाणतो त्याला कधीं कर्म बंध करू शकत नाही. याप्रकारें जाणूनच पूर्वीपूर्वी मुमुक्षूंनी कर्मे केलीं. १९-२०.

वासनासहितादाद्यात्संसारकारणाद्दृढात् ।
अज्ञानबन्धनाज्जन्तुर्बुद्ध्वायं मुच्यतेऽखिलात् ॥ २१ ॥
वासनेसहित संसाराचे आद्य व दृढ कारण जें अज्ञानाचे बंधन त्या सर्वांपासून हा प्राणी ज्ञान पावल्यावर मुक्त होतो. २१.

तदकर्म च कर्मापि कथयाम्यधुना तव ।
यत्र मौनं गता मोहादृषयो बुद्धिशालिनः ॥ २२ ॥
आतां ज्यासंबंधानें बुद्धिमान् ऋषि देखील मोह पावले तो कर्म में अकर्म यांचा विचार मी तुला सांगतो. २२.

तत्त्वं मुमुक्षुणा ज्ञेयं कर्माकर्मविकर्मणाम् ।
त्रिविधानीह कर्माणि सुनिम्नैषां गतिः प्रिय ॥ २३ ॥
कर्म, अकर्म व विकर्म यांचे तत्त्व मुमुक्षूने जाणावें. या लोकीं कर्में तीन प्रकारची आहेत. हे प्रिया, यांची गति फार सूक्ष्म आहे. २३.

क्रियायामक्रियाज्ञानमक्रियायां क्रियामतिः ।
यस्य स्यात्स हि मर्त्येऽस्मिँल्लोके मुक्तोऽखिलार्थकृत् ॥ २४ ॥
कर्माचे ठिकाणीं अकर्माचे ज्ञान व अकमचे ठिकाणी कर्माचें ज्ञान ज्याला असेल तो या मर्त्यलोकीं मुक्त व सर्व पुरुषार्थ संपादन करणारा होय. २४.

कर्मांकुरवियोगेन यः कर्माण्यारभेन्नरः ।
तत्त्वदर्शननिर्दग्धक्रियमाहुर्बुधा बुधम् ॥ २५ ॥
फलांनीं राहत असा जो मनुष्य कर्माचा आरंभ करतो त्या, तत्वदर्शनाचे योगानें ज्याचे कर्म दग्ध झालें आहे अशा, मनुष्याला ज्ञाते ज्ञाता असे म्हणतात. २५.

फलतृष्णां विहाय स्यात्सदा तृप्तो विसाधनः ।
उद्युक्तोऽपि क्रियां कर्तुं किंचिन्नैव करोति सः ॥ २६ ॥
जो फलेच्छा सोडून सर्वदा तृप्त असतो व साधनरहित असतो, तो कर्म करण्यास उद्युक्त असला [= कर्म करीत असला तरी कांहीं करीत नाहीं. २६.

निरीहो निगृहीतात्मा परित्यक्तपरिग्रहः ।
केवलं वै गृहं कर्माचरन्नायाति पातकम् ॥ २७ ॥
निरिच्छ, इद्रियांचा निग्रह केलेला, सर्व परिग्रह [व्याप] टाकून दिलेला असा जो मनुष्य केवळ गृहसंबंधी कर्म करतो त्याला पातक लागत नाहीं. २७.

अद्वन्द्वोऽमत्सरो भूत्वा सिद्ध्यसिद्ध्योः समश्च यः ।
यथाप्राप्त्येह संतुष्टः कुर्वन्कर्म न बध्यते ॥ २८ ॥
सुख व दुःख या द्वंद्वाने रहित व मत्सररहित होऊन आणि सिद्धि व असिद्धि यांचे ठिकाणीं समान होऊन जें प्राप्त होईल त्यामध्ये संतुष्ट असणारा कर्म करीत असला तरी बद्ध होत नाहीं. २८.

अखिलैर्विषयैर्मुक्तो ज्ञानविज्ञानवानपि ।
यज्ञार्थं तस्य सकलं कृतं कर्म विलीयते ॥ २९ ॥
सर्व विषयांपासून मुक्त व ज्ञान आणि विज्ञान [अनुभवयुक्त ज्ञान] यांनी युक्त अशा मनुष्याचे सर्व कर्म यज्ञार्थ होते. त्याने केलेल्या सर्व कर्माचा लय अथवा नाश होतो [ म्ह० तो कर्म करीत नाहीं असे समजावे ]. २९.

अहमग्निर्हविर्होता हुतं यन्मयि चार्पितम् ।
ब्रह्माप्तव्यं च तेनाथ ब्रह्मण्येव यतो रतः ॥ ३० ॥
अग्नि, हवि [ हवन करावयाचे द्रव्य ], होता, व जे माझ्यामध्यें अर्पण केलेले द्रव्य आणि यज्ञाचे प्राप्तव्य जे ब्रह्म ते सर्व मी आहें. ज्ञानी ब्रह्माचे ठिकाणी रममाण होतो तर याकरितांच [तेन ]. ३०.

योगिनः केचिदपरे दिष्टं यज्ञं वदन्ति च ।
ब्रह्माग्निरेव यज्ञो वै इति केचन मेनिरे ॥ ३१ ॥
दुसरे कोणी योगी शास्त्रांनीं दाखविलेला यज्ञ करावा असे म्हणतात. ब्रह्म हाच अग्नि ज्यामध्ये आहे असा तरी एक यज्ञच होय [ म्ह० ब्रह्मज्ञान ] असे दुसर्‍या योग्यांचे मत आहे. ३१.

संयमाग्नौ परे भूप इन्द्रियाण्युपजुह्वति ।
खाग्निष्वन्ये तद्विषयांश्छब्दादीनुपजुह्वति ॥ ३२ ॥
हे राजा, दुसरे कोणी संयमरूपी अग्नीचे ठिकाणीं इंद्रियांचे हवन करतात. दुसरे कोणी इंद्रियरूपी अग्नींचे ठिकाणी त्यांच्या [म्ह० इंद्रियांच्या] शब्दादि विषयांचे हवन करतात. ३२.

प्राणानामिन्द्रियाणां च परे कर्माणि कृत्स्नशः ।
निजात्मरतिरूपेऽग्नौ ज्ञानदीप्ते प्रजुह्वति ॥ ३३ ॥
दुसरे कोणी प्राणांच्या आणि इंद्रियांच्या कर्मांचें सर्वथा ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मानंदरूपी अग्निमध्ये हवन करतात. ३३.

द्रव्येण तपसा वापि स्वाध्यायेनापि केचन ।
तीव्रव्रतेन यतिनो ज्ञानेनापि यजन्ति माम् ॥ ३४ ॥
दुसरे कोणी यति द्रव्याने, कोणी तपाने, कोणी ध्यानानें, कोणी तीव्र व्रताने आणि कोणी ज्ञानाने माझे यजन करतात. ३४.

प्राणेऽपानं तथा प्राणमपाने प्रक्षिपन्ति ये ।
रुद्ध्वा गतीश्चोभयोस्ते प्राणायामपरायणाः ॥ ३५ ॥
जे प्राणवायूचे ठिकाणी अपान म्ह० रेचक आणि अपानवायूचे ठिकाणीं प्राण ह्म० पूरक, दोहोंच्याहि गतींचा रोध करून म्ह० कुंभक ठेवतात ते प्राणायामतत्पर होत. ३५.

जित्वा प्राणान्प्राणगतीरुपजुह्वति तेषु च ।
एवं नानायज्ञरता यज्ञध्वंसितपातकाः ॥ ३६ ॥
नित्यं ब्रह्म प्रयान्त्येते यज्ञशिष्टामृताशिनः ।
अयज्ञकारिणो लोको नायमन्यः कुतो भवेत् ॥ ३७ ॥
ते प्राणांना जिंकून त्यांचे ठिकाणीं प्राणाच्या गतींचे हवन करतात. याप्रमाणे नानाप्रकारच्या यज्ञांचे ठिकाणीं रत असलेले व यज्ञानें पातकांचा नाश झालेले असे हे यज्ञाचे अवशिष्ठ जें अमृतरूपी फल ते भोगणारे होत्साते ब्रह्माप्रत जातात. यज्ञ न करणाराला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही, मग परलोक कोठून प्राप्त होणार ? ३६-३७.

कायिकादित्रिधाभूतान्यज्ञान्वेदे प्रतिष्ठितान् ।
ज्ञात्वा तानखिलान्भूप मोक्ष्यसेऽखिलबन्धनात् ॥ ३८ ॥
हे राजा, वेदांमध्ये स्थान पावलेल्या [ म्ह० सांगितलेल्या ] कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन प्रकारच्या त्या यज्ञांना पूर्ण जाणल्यावर तू सर्व बंधनापासून मुक्त होशील. ३८.

सर्वेषां भूप यज्ञानां ज्ञानयज्ञः परो मतः ।
अखिलं लीयते कर्म ज्ञाने मोक्षस्य साधने ॥ ३९ ॥
हे राजा, सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. मोक्षाचे साधन जें ज्ञान त्याचे ठिकाणी सर्व कर्माचा लय होतो. ३९.

तज्ज्ञेयं पुरुषव्याघ्र प्रश्नेन नतितः सताम् ।
शुश्रूषया वदिष्यन्ति संतस्तत्त्वविशारदाः ॥ ४० ॥
हे पुरुषश्रेष्ठा, सजनांना प्रश्न करून आणि नम्रता धरून ते ज्ञान प्राप्त करावयाचे असते. हें ज्ञान जाणण्याची खरी इच्छा असली म्हणजे तत्त्वविशारद सज्जन सांगतात. ४०.

नानासंगाञ्जनः कुर्वन्नैकं साधुसमागमम् ।
करोति तेन संसारे बन्धनं समुपैति सः ॥ ४१ ॥
एक साधुसंग न करतां मनुष्य नानाप्रकारचे संग करतो व तेणेंकरून तो जगामध्ये बंधन पावतो. ४१.

सत्संगाद्गुणसंभूतिरापदां लय एव च ।
स्वहितं प्राप्यते सर्वैरिह लोके परत्र च ॥ ४२ ॥
सत्संगापासून सर्वांना गुणांची उत्पत्ति, आपत्तींचा नाश आणि इहलोकीं व परलोकीं स्वहित हीं प्राप्त होतात. ४२.

इतरत्सुलभं राजन्सत्संगोऽतीव दुर्लभः ।
यज्ज्ञात्वा पुनर्बन्धमेति ज्ञेयं ततस्ततः ॥ ४३ ॥
हे राजा, इतर गोष्टी सुलभ आहेत, पण सत्संग अतिशय दुर्लभ आहे. याचें ज्ञान झालें म्हणजे कोणत्याहि गोष्टीपासून [ततस्ततः ] मनुष्य पुन्हां बंध पावत नाहीं असें जाण । इति ज्ञेयं ]. ४३.

ततः सर्वाणि भूतानि स्वात्मन्येवाभिपश्यति ।
अतिपापरतो जंतुस्ततस्तस्मात्प्रमुच्यते ॥ ४४ ॥
नंतर म्ह० सत्संगानंतर स्वतःचे ठिकाणी सर्व भूतमात्र आहे असे तो पहातो. त्याचे योगानें [= ततः = स्वतःचे ठिकाणीं भूतमात्राचें दर्शन झाल्यानें] अत्यंत पापाचे ठिकाणी रत असला तरी त्यापासून मोकळा होतो. ४४.

द्विविधान्यपि कर्माणि ज्ञानाग्निर्दहति क्षणात् ।
प्रसिद्धोऽग्निर्यथा सर्वं भस्मतां नयति क्षणात् ॥ ४५ ॥
ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नि क्षणांत सर्वांचे भस्म करतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नि बाह्य व आंतर अशा दोन प्रकारच्या कर्मांचे क्षणांत दहन करतो. ४५.

न ज्ञानसमतामेति पवित्रमितरन्नृप ।
आत्मन्येवावगच्छन्ति योगात्कालेन योगिनः ॥ ४६ ॥
हे राजा, इतर कोणतीहि पवित्र वस्तु ज्ञानाच्या बरोबरीला येत नाहीं. योगी योगाभ्यासानें कालेंकरून स्वतःचे ठिकाणी ज्ञान जाणतात, ४६.

भक्तिमानिन्द्रियजयी तत्परो ज्ञानमाप्नुयात् ।
लब्ध्वा तत्परमं मोक्षं स्वल्पकालेन यात्यसौ ॥ ४७ ॥
भक्तिमान्, इंद्रियें जिंकलेल्या व ज्ञानतत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान मिळविल्यानंतर अल्पकाळांत तो उत्तम मोक्षाला जातो. ४७.

भक्तिहीनोऽश्रद्दधानः सर्वत्र संशयी तु यः ।
तस्य शं नापि विज्ञानमिह लोकोऽथ वा परः ॥ ४८ ॥
पण जो भक्तिहीन, श्रद्धाहीन व सर्वत्र संशयी असतो त्याचे कल्याण होत नाही, त्याला ज्ञान मिळत नाहीं, त्याला इहलोक नाहीं अथवा परलोक नाहीं. ४८.

आत्मज्ञानरतं ज्ञाननाशिताखिलसंशयम् ।
योगास्ताखिलकर्माणं बध्नन्ति भूप तानि न ॥ ४९ ॥
हे भूपा, आत्मज्ञानाचे ठिकाणी रत असलेल्या, ज्ञानाचे योगाने ज्याने सर्व संशयांचा नाश केला आहे, योगाचे योगानें ज्याची सर्व कर्में अस्त पावली आहेत, अशा मनुष्याला बद्ध करीत नाहींत. ४९.

ज्ञानखड्गप्रहारेण संभूतामज्ञतां बलात् ।
छित्वान्तःसंशयं तस्माद्योगयुक्तो भवेन्नरः ॥ ५० ॥
याकरितां, उत्पन्न झालेल्या अज्ञानाला आणि आंत अथवा मनामध्ये ) असलेल्या संशयाला ज्ञानरूपी खड्गाच्या प्रहाराने जोरानें छेदून टाकून मनुष्याने योगयुक्त व्हावे.५०.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे विज्ञानप्रतिपादनो नाम तृतीयोऽध्यायः ॥
विज्ञानप्रतिपादन नामे तिसरा अध्याय समाप्त ॥ ३ ॥


॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )