Gurudev

Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ द्वितीयोऽध्यायः ॥

॥ अध्याय दुसरा - कर्मयोग ॥


वरेण्य उवाच -
ज्ञाननिष्ठा कर्मनिष्ठा द्वयं प्रोक्तं त्वया विभो ।
अवधार्य वदैकं मे निःश्रेयसकरं नु किम् ॥ १ ॥
वरेण्य म्हणाले , हे विभो [सर्वव्यापी ईश्वरा], ज्ञानाचे ठिकाणी
निष्ठा व कर्माचे ठिकाणी निष्ठा अशा दोन तू सांगितल्यास.
यांपैकीं मोक्षप्रद कोणती ती एक विचार करून मला सांग. १.


गजानन उवाच -
अस्मिंश्चराचरे स्थित्यौ पुरोक्ते द्वे मया प्रिय ।
सांख्यानां बुद्धियोगेन वैधयोगेन कर्मिणाम् ॥ २ ॥
श्री गजानन म्हणाले, हे प्रिया जगाच्या स्थितीकरितां दोन निष्ठा
मीं पूर्वी सांगितल्या.सांख्यांची बुद्धियोगानें आणि कर्मवाद्यांची
कर्मयोगानें [वैधयोगेन ]. २.


अनारम्भेण वैधानां निष्क्रियः पुरुषो भवेत् ।
न सिद्धिं याति संत्यागात्केवलात्कर्मणो नृप ॥ ३ ॥
कर्माच्या अनारंभानें [आरंभावांचून] पुरुष निष्क्रिय होतो; हे राजा,
कर्माच्या केवल त्यागापासून सिद्धि प्राप्त होत नाहीं. ३.


कदाचिदक्रियः कोऽपि क्षणं नैवावतिष्ठते ।
अस्वतन्त्रः प्रकृतिजैर्गुणैः कर्म च कार्यते ॥ ४ ॥
केव्हांहि, क्षणभर देखील कोणीहि कर्महीन रहात नाहीं. मनुष्य
अस्वतंत्र असतो. स्वभावज अथवा नैसर्गिक गुणांकडून कर्म
करविलें जाते. ४.


कर्मकारीन्द्रियग्रामं नियम्यास्ते स्मरन्पुमान् ।
तद्‌गोचरान्मन्दचित्तो धिगाचारः स भाष्यते ॥ ५ ॥
पुरुष कर्म करणारा असून इंद्रियसमुदायाचे नियमन करून पण
त्याच्या विषयाचे स्मरण करीत रहातो, तो मंदबुद्धि होय. याला
खोटा अथवा निंदास्पद आचार म्हणतात. ५.


तद्‌ग्रामं संनियम्यादौ मनसा कर्म चारभेत् ।
इन्द्रियैः कर्मयोगं यो वितृष्णः स परो नृप ॥ ६ ॥
अगोदर मनाने त्या इंद्रिय-समुदायाचे नियमन करून जो विषयांविषयीं
इच्छा नसलेला पुरुष कर्म व कर्मयोग आरंभ करतो तो,
हे राजा, श्रेष्ठ होय. ६.


अकर्मणः श्रेष्ठतमं कर्मानीहाकृतं तु यत् ।
वर्ष्मणः स्थितिरप्यस्याकर्मणो नैव सेत्स्यति ॥ ७ ॥
अनिच्छेनें केलेलें जें कर्म ते निष्कर्माहून अत्यंत श्रेष्ठ होय.
अशा निष्कर्त्यांच्या देहाची स्थिति देखील सिद्ध होत नाहीं
म्हणजे देहधारी मनुष्य कर्मावांचून रहाणेच शक्य नाहीं. ७.


असमर्प्य निबध्यन्ते कर्म तेन जना मयि ।
कुर्वीत सततं कर्मानाशोऽसङ्‌गो मदर्पणम् ॥ ८ ॥
कर्म मला अर्पण न करून त्याच्या योगाने मनुष्य बंधन
पावतात. आशारहित व आसक्तिरहित होऊन नेहमीं कर्म
मला अर्पण करावे, ८,


मदर्थे यानि कर्माणि तानि बध्नन्ति न क्वचित् ।
सवासनमिदं कर्म बध्नाति देहिनं बलात् ॥ ९ ॥
मत्प्रीत्यर्थ केलेली जीं कर्में तीं कधींहि बद्ध करीत नाहींत.
वासनापूर्वक असलेलें जे कर्म तें प्राण्याला हटकून बद्ध
करते. ९.


वर्णान्सृष्ट्‍वावदं चाहं सयज्ञांस्तान्पुरा प्रिय ।
यज्ञेन ऋध्यतामेष कामदः कल्पवृक्षवत् ॥ १० ॥
हे प्रिया, यज्ञासहवर्तमान (ब्राह्मणादि) वर्णांना पूर्वी मी
निर्माण करून सांगितले की, यज्ञाने तुम्ही आपली समृद्धि
करून घ्या. हा यज्ञ कल्पवृक्षाप्रमाणे मनोरथ
पूर्ण करणारा आहे. १०.


सुरांश्चान्नेन प्रीणध्वं सुरास्ते प्रीणयन्तु वः ।
लभध्वं परमं स्थानमन्योन्यप्रीणनात्स्थिरम् ॥ ११॥
याने तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हांला संतुष्ट करोत.
एकमेकांचा संतोष केल्याने शाश्वत व श्रेष्ठ असे स्थान
तुम्हांला मिळेल. ११.


इष्टा देवाः प्रदास्यन्ति भोगानिष्टान्सुतर्पिताः ।
तैर्दत्तांस्तान्नरस्तेभ्योऽदत्वा भुङ्क्ते स तस्करः ॥ १२॥
ज्यांचे यजन केले आहे व उत्तम प्रकारे ज्यांची तृप्ति
केली आहे असे देव तुम्हांला इष्ट भोग देतील. त्यांनी
दिलेले ते भोग जो मनुष्य त्यांना दिल्यावांचून
भोगतो तो चोर होय. १२.


हुतावशिष्टभोक्तारो मुक्ताः स्युः सर्वपातकैः ।
अदन्त्येनो महापापा आत्महेतोः पचन्ति ये ॥ १३ ॥
हवनाचा अवशिष्ट सेवन करणारे सर्व पातकांपासून मुक्त होतात.
जे स्वतःकरितां अन्नाचा पाक करतात ते महापापी मनुष्य
पाप भक्षण करतात. १३.


ऊर्जो भवन्ति भूतानि देवादन्नस्य संभवः ।
यज्ञाच्च देवसंभूतिस्तदुत्पत्तिश्च वैधतः ॥ १४ ॥
अन्नापासून भूतमात्र उत्पन्न होतात, देवापासून अन्नाची उत्पत्ति होते,
यज्ञापासून देवांची उत्पत्ति होते आणि यज्ञाची उत्पत्ति कर्मापासून. १४.


ब्रह्मणो वैधमुत्पन्नं मत्तो ब्रह्मसमुद्भवः ।
अतो यज्ञे च विश्वस्मिन् स्थितं मां विद्धि भूमिप ॥ १५ ॥
ब्रह्मदेवापासून कर्म उत्पन्न शाले, माझ्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ति झाली.
म्हणून हे राजा, सर्व यज्ञांमध्ये मी आहे असे जाण. १५.


संसृतीनां महाचक्रं क्रामितव्यं विचक्षणैः ।
स मुदा प्रीणते भूपेन्द्रियक्रीडोऽधमो जनः ॥ १६ ॥
ज्ञानी पुरुषांनी संसाराचे महाचक्र आक्रमण करून जावे. हे राजा,
जो अधम जन तो इंद्रियांनीं क्रीडा करणारा आनंदात
संतुष्ट होतो. १६.


अन्तरात्मनि यः प्रीत आत्मारामोऽखिलप्रियः ।
आत्मतृप्तो नरो यः स्यात्तस्यार्थो नैव विद्यते ॥ १७ ॥
अंतरात्म्यामध्ये जो संतुष्ट असतो, जो आत्मस्वरूपी रममाण असतो,
ज्याला सर्वच प्रिय असतें, ज्याचा आत्मा तृप्त असतो त्याला कोणताहि
इंद्रियाचा अर्थ रहात नाहीं. १७.


कार्याकार्यकृतीनां स नैवाप्नोति शुभाशुभे ।
किंचिदस्य न साध्यं स्यात्सर्वजन्तुषु सर्वदा ॥ १८ ॥
कर्तव्य अथवा अकर्तव्य अशा कर्मांचे त्याला शुभ अथवा
अशुभ फल मिळत नाहीं. सर्व प्राण्यांमध्ये कधीहि त्याला
साधावयाची अशी गोष्ट [साध्यं ] राहिलेली नसते. १८.


अतोऽसक्ततया भूप कर्तव्यं कर्म जन्तुभिः ।
सक्तोऽगतिमवाप्नोति मामवाप्नोति तादृशः ॥ १९ ॥
म्हणून हे राजा, प्राण्यांनी आसक्तिरहित कर्म केले पाहिजे,
आसक्तियुक्त मनुष्य अगति [ अधःपतन ] पावतो. वर
सांगितल्याप्रमाणे आचरण करणारा म्हणजे आसक्तिराहित
कर्म करणारा मजप्रत येतो. १९.


परमां सिद्धिमापन्नाः पुरा राजर्षयो द्विजाः ।
संग्रहाय हि लोकानां तादृशं कर्म चारभेत् ॥ २० ॥
पूर्वी राजर्षि व ब्राह्मण यांनी श्रेष्ठ सिद्धि [मोक्ष] मिळविली आहे.
म्हणून लोकसंग्रहाकरितां तशा प्रकारचे आसक्तिरहित कर्म
आरंभावें. २०.


श्रेयान्यत्कुरुते कर्म तत्करोत्यखिलो जनः ।
मनुते यत्प्रमाणं स तदेवानुसरत्यसौ ॥ २१ ॥
श्रेष्ठ पुरुष जें कर्म करतो, तेच सर्व जन करतात.
तो जें प्रमाण मानतो त्यालाच ते सर्व जन
अनुसरतात. २१.


विष्टपे मे न साध्योऽस्ति कश्चिदर्थो नराधिप ।
अनालब्धश्च लब्धव्यः कुर्वे कर्म तथाप्यहम् ॥ २२ ॥
हे राजा, जगामध्ये मला कोणताहि अर्थ साध्य करावयाचा नाहीं,
न मिळालेला मिळवावयाचा नाहीं; तथापि मी कर्म करतों. २२.


न कुर्वेऽहं यदा कर्म स्वतन्त्रोऽलसभावितः ।
करिष्यन्ति मम ध्यानं सर्वे वर्णा महामते ॥ २३ ॥
स्वतःच्या तंत्राने चालणारा व आळसाने युक्त होत्साता मी जर
[ यदा=यदि ] कर्म करणार नाही, तर हे महामते, सर्व वर्ण
माझेच ध्यान करतील [ म्ह० मला अनुसरतील ]. २३.


भविष्यन्ति ततो लोका उच्छिन्नाः संप्रदायिनः ।
हंता स्यामस्य लोकस्य विधाता संकरस्य च ॥ २४ ॥
तेणेंकरून संप्रदायी लोकांचा उच्छेद होईल. या लोकांचा मी हन्ता होईन,
संकराचा कर्ता होईन म्ह० उच्छेदाला व संकराला कारण होईन . २४.


कामिनो हि सदा कामैरज्ञानात्कर्मकारिणः ।
लोकानां संग्रहायैतद्विद्वान् कुर्यादसक्तधीः ॥ २५ ॥
कामी [= इच्छा करणारे ] जन सर्वदा इच्छेमुळे व अज्ञानाने
कर्म करतात. ज्ञात्याने असक्तबुद्धि होऊन लोक संग्रहा करितां
कर्म करावे. २५.


विभिन्नत्वमतिं जह्यादज्ञानां कर्मचारिणाम् ।
योगयुक्तः सर्वकर्माण्यर्पयेन्मयि कर्मकृत् ॥ २६ ॥
कर्म करणार्‍या योग्याने (इच्छायुक्त) कर्म करणार्‍या अज्ञ
मनुष्यांच्या भेदबुद्धीचा त्याग करावा व सर्व कर्में माझ्या
ठिकाणी अर्पण करावी. २६.


अविद्यागुणसाचिव्यात्कुर्वन्कर्माण्यतन्द्रितः ।
अहंकाराद्भिन्नबुद्धिरहंकर्तेति योऽब्रवीत् ॥ २७ ॥
अहंकारामुळे ज्याची बुद्धी भेद पावली आहे म्ह०
परमात्म्याहून मी वेगळा आहे असे मानते असा
जो "मी कर्ता" असे म्हणतो तो अविद्या व गुण
यांचा सचिव [म्ह० आज्ञेप्रमाणे काम करणारा सेवक ]
झाल्यामुळे आलस्यरहित होत्साता कर्म करणारा होतो. २७.


यस्तु वेत्त्यात्मनस्तत्त्वं विभागाद्गुणकर्मणोः ।
करणं विषये वृत्तमिति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥
गुण व कर्म यांच्याहून आत्म्याचे तत्त्व भिन्न आहे असें जो
मानतो तो "इंद्रिय (इंद्रियाचे) विषयाचे ठिकाणी प्रवृत्त होते
(मी त्याच्या कर्तृत्वापासून अलग आहे)" असे मानून
आसक्त होत नाहीं. २८.


कुर्वन्ति सफलं कर्म गुणैस्त्रिभिर्विमोहिताः ।
अविश्वस्तः स्वात्मद्रुहो विश्वविन्नैव लंघयेत् ॥ २९ ॥
तीन गुणांनी मोह पावलेले फलयुक्त कर्म करतात. आत्म्याचा द्रोह
करणार्‍या [फलयुक्त कर्म करणार्‍या] मनुष्यांना स्वतः फलयुक्त
कर्माविषयीं विश्वासरहित रहाणार्‍या सर्वज्ञाने सोडून जाऊ नये. २९.


नित्यं नैमित्तिकं तस्मान्मयि कर्मार्पयेद्बुधः ।
त्यक्त्वाहंममताबुद्धिं परां गतिमवाप्नुयात् ॥ ३० ॥
म्हणून शहाण्या मनुष्यानें नित्य व नैमित्तिक असे दोन्ही प्रकारचे
कर्म माझे ठिकाण अर्पण करावें. अहंकार आणि ममत्वबुद्धि सोडून
परमश्रेष्ठ अशी गति मिळवावी. ३०


अनीर्ष्यन्तो भक्तिमन्तो ये मयोक्तमिदं शुभम् ।
अनुतिष्ठन्ति ये सर्वे मुक्तास्तेऽखिलकर्मभिः ॥ ३१॥
ईर्षारहित व भक्तीने युक्त जे मी सांगितलेले हे शुभ वचन
अनुसरतात ते सर्व सर्व कर्मापासून मुक्त होतात. ३१.


ये चैव नानुतिष्ठन्ति त्वशुभा हतचेतसः ।
ईर्ष्यमाणान्महामूढान्नष्टांस्तान्विद्धि मे रिपून् ॥ ३२॥
जे कल्याणरहित हतबुद्धि जन याप्रमाणे वागत नाहींत ते
ईर्षायुक्त, महामूढ, नष्ट व माझे शत्रु आहेत असे जाण. ३२.


तुल्यं प्रकृत्या कुरुते कर्म यज्ज्ञानवानपि ।
अनुयाति च तामेवाग्रहस्तत्र मुधा मतः ॥ ३३ ॥
स्वभावाला तुल्य असें जें कर्म ज्ञानी मनुष्य देखील करतो तें तो
त्याला [=स्वभावाला ] अनुसरतो म्हणून. त्यासंबंधाने आग्रह
करणे व्यर्थ होय. ३३.


कामश्चैव तथा क्रोधः खानामर्थेषु जायते ।
नैतयोर्वश्यतां यायादस्य विध्वंसकौ यतः ॥ ३४ ॥
काम तसाच क्रोध इंद्रियांच्या अर्थांचे ठिकाणी उत्पन्न होतो. ज्या
अर्थीं हे काम व क्रोध मनुष्याचे नाश करणारे आहेत त्या अर्थी
त्यांना वश होऊ नये. ३४.


शस्तोऽगुणो निजो धर्मः सांगादन्यस्य धर्मतः ।
निजे तस्मिन्मृतिः श्रेयोऽपरत्र भयदः परः ॥ ३५ ॥
सांगोपांग आचरण केलेल्या दुसर्‍याच्या धर्माहून स्वतःचा धर्म
गुणहीन असला तथापि अधिक स्तुतीस पात्र आहे. स्वतःचे
धर्मामध्ये मरण श्रेयस्कर आहे. परधर्म परलोकीं भय देणारा आहे. ३५.


वरेण्य उवाच -
पुमान्यत्कुरुते पापं स हि केन नियुज्यते ।
अकाङ्क्षन्नपि हेरम्ब प्रेरितः प्रबलादिव ॥ ३६ ॥
वरेण्य म्हणाले , हे हेरंबा, इच्छा नसतांहि बलवत्तर कारणाने
जणूं प्रेरित होत्साता पुरुष जे पाप करतो, ते करण्याविषयीं त्याची
कोण योजना करतो ? ३६.


श्रीगजानन उवाच -
कामक्रोधौ महापापौ गुणद्वयसमुद्भवौ ।
नयन्तौ वश्यतां लोकान् विद्ध्येतौ द्वेषिणौ वरौ ॥ ३७॥
श्री गजानन म्हणाले , रज व तम या दोन गुणांपासून उत्पन्न झालेले,
अत्यंत पापयुक्त काम आणी क्रोध(कामना होऊन ती अपूर्ण असल्यामुळे,
एक इच्छा झाली की मानवाला नवीन तयार होते व काम ह्याची पूर्ती होत नाही).
हा असीमित हव्यासा मुळे येणारा आंधळा व विनाशकारी क्रोध) लोकांना आपल्या
वश्यतेप्रत नेणारे आहेत व हे प्रबल शत्रु आहेत असे जाण. ३७.


आवृणोति यथा माया जगद्‌बाष्पो जलं यथा ।
वर्षामेघो यथा भानुं तद्वत्कामोऽखिलांश्च रुट् ॥ ३८॥
ज्याप्रमाणे माया जगाला, बाष्प जलाला, वर्षाकालाचा मेघ सूर्याला
आच्छादित करतो त्याप्रमाणे काम व क्रोध सर्व प्राण्यांना
आच्छादित करतात. ३८.


प्रतिपत्तिमतो ज्ञानं छादितं सततं द्विषा ।
इच्छात्मकेन तरसा दुष्पोष्येण च शुष्मिणा ॥ ३९ ॥
इच्छारूपी, वेगवान्, तृप्ति करण्यास अशक्य व अग्निरूपी अशा
या शत्रूनें ज्ञानी मनुष्याचें ज्ञान सतत आच्छादिलेले आहे. ३९.


आश्रित्य बुद्धिमनसी इन्द्रियाणि स तिष्ठति ।
तैरेवाच्छादितप्रज्ञो ज्ञानिनं मोहयत्यसौ ॥ ४० ॥
बुद्धि, मन व इंद्रियें यांचा आश्रय करून तो रहातो. बुद्धीला
आच्छादित करणारा तो त्यांचेच [ म्ह० इंद्रियांचे ] योगानें
ज्ञान्याला मोह पाडतो. ४०.


तस्मान्नियम्य तान्यादौ समनांसि नरो जयेत् ।
ज्ञानविज्ञानयोः शान्तिकरं पापं मनोभवम् ॥ ४१ ॥
म्हणून अगोदर मनासह त्यांचे [ म्ह० इंद्रियांचें ] नियमन
करून त्यांना मनुष्याने जिंकावे. मनापासून उत्पन्न होणारें
पाप ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणारे आहे. ४१


यतस्तानि पराण्याहुस्तेभ्यश्च परमं मनः ।
ततोऽपि हि परा बुद्धिरात्मा बुद्धेः परो मतः ॥ ४२॥
कारण, ती [इंद्रियें] देहाहून श्रेष्ठ आहेत, मन त्यांहून श्रेष्ठ आहे,
बुद्धि मनाहून श्रेष्ठ आहे व आत्मा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे
(ज्ञात्यांचे ) मत आहे. ४२.


बुद्ध्वैवमात्मनात्मानं संस्तभ्यात्मानमात्मना ।
हत्वा शत्रुं कामरूपं परं पदमवाप्नुयात् ॥ ४३ ॥
याप्रकारे बुद्धीने आत्म्याला जाणून, स्वतः मनाचे संयमन
करून, कामरूपी शत्रूला ठार करून श्रेष्ठ पद मिळवावें. ४३.


इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु
योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे
गजाननवरेण्यसंवादे कर्मयोगो नाम द्वितीयोऽध्यायः
दुसरा अध्याय समाप्त ॥ २ ॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )