Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ एकादशोऽध्यायः ॥

॥ अध्याय अकरावा - त्रिविधवस्तुविवेकनिरूपणम् ॥


श्रीगजानन उवाच -
तपोऽपि त्रिविधं राजन्कायिकादिप्रभेदतः ॥
ऋजुतार्जवशौचानि ब्रह्मचर्यमहिंसनम् ॥ १ ॥
गुरुविज्ञद्विजातीनां पूजनं चासुरद्विषाम् ॥
स्वधर्मपालनं नित्यं कायिकं तप ईदृशम् ॥ २ ॥
श्रीगजानन म्हणाले , हे राजा, तप देखील कायिक इत्यादि भेदानें तीन प्रकारचे आहे. ऋजुता [=सरळपणा= कोणत्याहि भानगडीत न पडतां सरळ मार्गाने जाणे ], आर्जव [=सरळपणा=कोणाचीहि भीड न धरितां स्वतःला योग्य वाटणार्‍या मार्गाने जाणे ], शौच, ब्रह्मचर्य, अहिंसा, गुरुज्ञानी--ब्राह्मण-व देव यांचे पूजन करणे, नित्य स्वधर्मपालन या प्रकारचे तप कायिक तप होय. १-२.

मर्मास्पृक्‌च प्रियं वाक्यमनुद्वेगं हितं ऋतम् ॥
अधीतिर्वेदशास्त्राणां वाचिकं तप ईदृशम् ॥ ३ ॥
मर्माला स्पर्श न करणारे, प्रिय, उद्वेग ने करणारें, हितकारक व सत्य असे भाषण आणि वेदशास्त्रांचे अध्ययन या प्रकारचे तप वाचिक तप होय. ३.

अन्तःप्रसादः शान्तत्वं मौनमिन्द्रियनिग्रहः ॥
निर्मलाशयता नित्यं मानसं तप ईदृशम् ॥ ४ ॥
मनाची प्रसन्नता, शान्ति, मौन, इंद्रियनिग्रह, नित्य शुद्ध अंतःकरण या प्रकारचे तप मानस तप होय. ४.

अकामतः श्रद्धया च यत्तपः सात्त्विकं च तत् ॥
ऋध्यै सत्कारपूजार्थं सदम्भं राजसं तपः ॥ ५ ॥
फलेच्छारहित व श्रद्धापूर्वक जें तप ते सात्त्विक तप होय. समृद्धि होण्याच्या इच्छेनें, सत्कार व मान यांच्या उद्देशाने व दंभयुक्त जें तप ते राजस तप होय. ५.

तदस्थिरं जन्ममृती प्रयच्छति न संशयः ॥
परात्मपीडकं यच्च तपस्तामसमुच्यते ॥ ६ ॥
ते अस्थिर आहे व जन्ममृत्यु देते यांत संशय नाहीं. जे दुसर्‍याच्या अंतःकरणास पीडा देते त्याला तामस तप म्हणतात. ६.

विधिवाक्यप्रमाणार्थं सत्पात्रे देशकालतः ॥
श्रद्धया दीयमानं यद्दानं तत्सात्त्विकं मतम् ॥ ७ ॥
विधिवाक्यांच्या प्रामाण्याकरितां सत्पात्री व योग्य देश आणि काल यांना अनुसरून श्रद्धापूर्वक जें दान दिले जाते त्याला सात्विक दान म्हणतात. ७.

उपकारं फलं वापि काङ्‌क्षद्‌भिर्दीयते नरैः ॥
क्लेशतो दीयमानं वा भक्त्या राजसमुच्यते ॥ ८ ॥
उपकार अथवा फल यांची अकांक्षा करणार्‍या मनुष्यांकडून भक्तियुक्त अथवा क्लेशयुक्त जे दान दिले जाते त्याला राजस दान म्हणतात. ८.

अकालदेशतोऽपात्रेऽवज्ञया दीयते तु यत् ॥
असत्काराच्च यद्दत्तं तद्दानं तामसं स्मृतम् ॥ ९ ॥
अकाली आणि अस्थानीं अवज्ञापूवक अपात्राचे ठिकाणीं जें दान दिले जाते अथवा असत्कारपूर्वक जें दान दिले जाते त्याला तामस दान म्हणतात. ९.

ज्ञानं च त्रिविधं राजन् शृणुष्व स्थिरचेतसा ॥
त्रिधा कर्म च कर्तारं ब्रवीमि ते प्रसंगतः ॥ १० ॥
हे राजा, आतां तीन प्रकारचे ज्ञान स्थिर चित्ताने ऐक. तीन प्रकारचे कर्म आणि तीन प्रकारचे कर्ते हेहि मी ओघाने सांगतो. १०.

नानाविधेषु भूतेषु मामेकं वीक्षते तु यः ॥
नाशवत्सु च नित्यं मां तज्ज्ञानं सात्विकं नृप ॥ ११ ॥
हे नृपा, नानाविध भूतांचे ठिकाणीं जो मला एक रूपानें स्थित असा पहातो आणि नाशयुक्त वस्तूंचे ठिकाण मला नित्य [ म्हणजे नाशरहित ] जाणतो त्याचे ते ज्ञान सात्त्विक ज्ञान होय. ११.

तेषु वेत्ति पृथग्भूतं विविधं भावमाश्रितः ॥
मामव्ययं च तज्ज्ञानं राजसं परिकीर्तितम् ॥ १२ ॥
व्ययहित अशा मला त्यांचे ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या स्थितीचा आश्रय करून पृथक् राहिलेला असे जो जाणतो त्याच्या त्या ज्ञानाला राजस ज्ञान म्हणतात. १२.

हेतुहीनमसत्यं च देहात्मविषयं च यत् ॥
असदल्पार्थविषयं तामसं ज्ञानमुच्यते ॥ १३ ॥
ज्यामध्ये कांहीं उद्देश नाहीं असे असत्य, देह हाच आत्मा असा ज्या ज्ञानाचा विषय आहे असे, असद्विषयक व अल्पार्थविषयक असे जें ज्ञान त्याला तामस ज्ञान म्हणतात. १३.

भेदतस्त्रिविधं कर्म विद्धि राजन्मयेरितम् ॥
कामनाद्वेषदम्भैर्यद्‍रहितं नित्यकर्म यत् ॥ १४ ॥
कृतं विना फलेच्छां यत्कर्म सात्त्विकमुच्यते ॥
यद्‍बहुक्लेशतः कर्म कृतं यच्च फलेच्छया ॥ १५ ॥
क्रियमाणं नृभिर्दम्भात्कर्म राजसमुच्यते ॥
अनपेक्ष्य स्वशक्तिं यदर्थक्षयकरं च यत् ॥ १६ ॥
अज्ञानात्क्रियमाणं यत्कर्म तामसमीरितम् ॥
कर्तारं त्रिविधं विद्धि कथ्यमानं मया नृप ॥ १७ ॥
हे राजन् कर्माचें देखील तीन भेदांनी असलेले तीन प्रकार मी सांगतों ते ऐक. जे कामनारहित, दंभरहित व द्वेषरहित आहे असे, नित्यकर्म आणि फलेच्छेविरहित जें कर्म केले जाते त्याला सात्विक कर्म म्हणतात. जें बहुत क्लेशांनी केले जाते, जे फलेच्छेने केले जाते अथवा जें मनुष्य दंभाने करतो त्याला राजस कर्म म्हणतात. स्वसामर्थ्यांकडे दुर्लक्ष करून केले जाणारे, संपत्तीचा क्षय करणारे अथवा अज्ञानामुळे जे करतात त्याला तामस कर्म म्हटले आहे. हे नृपा, आतां मी सांगतो तो कर्ता देखील तीन प्रकारचा आहे असे जाण. १४-१७.

धैर्योत्साही समोऽसिद्धौ सिद्धौ चाविक्रियस्तु यः ॥
अहंकारविमुक्तो यः स कर्ता सात्त्विको नृप ॥ १८ ॥
हे नृपा, धैर्य व उत्साह यांनी युक्त, सिद्धि आणि सिद्धि यांचे ठिकाणीं समान, अविक्रिय [ इष्टानिष्टप्राप्तीमुळे ज्याच्यामध्यें फरक होत नाहीं असा ], अहंकाराने विमुक्त असा जो तो सात्त्विक कर्ता होय. १८.

कुर्वन्हर्षं च शोकं च हिंसां फलस्पृहां च यः ॥
अशुचिर्लुब्धको यश्च राजसोऽसौ निगद्यते ॥ १९ ॥
जो हर्ष, शोक, हिंसा व फलेच्छा करतो, जो अशुचि व लोभी असतो त्याला राजस कर्ता म्हणतात. १९.

प्रमादाज्ञानसहितः परोच्छेदपरः शठः ॥
अलसस्तर्कवान्यस्तु कर्तासौ तामसो मतः ॥ २० ॥
प्रमाद [ उन्मत्तपणा ] व अज्ञान यांनी युक्त, दुसर्‍यांच्या नाशाविषयीं तत्पर, शठ, आळशी, वितंडवादी जो, त्या कर्त्याला तामस कर्ता म्हणतात. २०.

सुखं च त्रिविधं राजन्दुःखं च क्रमतः शृणु ॥
सात्त्विकं राजसं चैव तामसं च मयोच्यते ॥ २१ ॥
हे राजन् सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे सुख आणि दुःख मी सांगतो ते क्रमाने ऐक. २१.

विषवद्‌भासते पूर्वं दुःखस्यान्तकरं च यत् ॥
इष्यमानं तथाऽऽवृत्त्या यदन्तेऽमृतवद्‌भवेत् ॥ २२ ॥
प्रसादात्स्वस्य बुद्धेर्यत्सात्त्विकं सुखमीरितम् ॥
विषयाणां तु यो भोगो भासतेऽमृतवत्पुरा ॥ २३ ॥
हालाहलमिवान्ते यद्‌राजसं सुखमीरितम् ॥
तन्द्रिप्रमादसंभूतमालस्यप्रभवं च यत् ॥ २४ ॥
सर्वदा मोहकं स्वस्य सुखं तामसमीदृशम् ॥
न तदस्ति यदेतैर्यन्मुक्तं स्यात्त्रिविधैर्गुणैः ॥ २५ ॥
अगोदर जे विषाप्रमाणे भासते, जें दुःखाचा अंत करणारे असतें, वरचेवर आल्याने ज्याच्या विषयी इच्छा वाढते, जें शेवटीं अमृताप्रमाणे होतें आणि स्वत:च्या बुद्धीच्या प्रसन्नतेने जें मिळतें, त्या सुखाला सात्विक सुख म्हणतात. जो विषयांचा भोग अगोदर अमृताप्रमाणे भासतो आणि अंतीं हालाहालाप्रमाणे होतो त्या सुखाला राजस सुख म्हणतात. मंदपणा, उन्मत्तपणा यांपासून उत्पन्न होणारे, आळसापासून उत्पन्न होणारे आणि नेहमी स्वतःला मोह पाडणारे असे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात. या तीन प्रकारच्या गुणांनी जे रहित आहे असे या विश्वामध्ये कांहीं नाहीं. २२-२५.

राजन्ब्रह्मापि त्रिविधमोंतत्सदिति भेदतः ॥
त्रिलोकेषु त्रिधा भूतमखिलं भूप वर्तते ॥ २६ ॥
हे राजा, ब्रह्म देखील ॐ, तत् आणि सत् या भेदांनीं तीन प्रकारचे आहे. हे भूपा, तीन प्रकारांनी असलेले ते सर्व त्रैलोक्यामध्ये आहे. २६.

ब्रह्मक्षत्रियविट्‌शूद्राः स्वभावाद्‌भिन्नकर्मिणः ॥
तानि तेषां तु कर्माणि संक्षेपात्तेऽधुना वदे ॥ २७ ॥
ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे स्वभावतः भिन्नकर्मी आहेत. त्यांची तीं तीं कर्मे तुला आतां संक्षेपाने सांगतो. २७.

अन्तर्बाह्येन्द्रियाणां च वश्यत्वमार्जवं क्षमा ॥
नानातपांसि शौचं च द्विविधं ज्ञानमात्मनः ॥ २८ ॥
वेदशास्त्रपुराणानां स्मृतीनां ज्ञानमेव च ॥
अनुष्ठानं तदर्थानां कर्म ब्राह्ममुदाहृतम् ॥ २९ ॥
आंतर व बाह्य इंद्रियें ताब्यांत असणे, सरळपणा, क्षमा, नानाप्रकारची तपे, ( आंतर व बाह्य ) दोन्ही प्रकारची शुद्धता, आत्माविषयक ज्ञान, वेदशास्त्रे-पुराणें-स्मृति यांचे ज्ञान व त्यांनी प्रतिपादित गोष्टी करणे याला ब्राह्मणाचे कर्म म्हटले आहे. २८-२९.

दार्ढ्यं शौर्यं च दाक्ष्यं च युद्धे पृष्ठाप्रदर्शनम् ॥
शरण्यपालनं दानं धृतिस्तेजः स्वभावजम् ॥ ३० ॥
प्रभुता मन औन्नत्यं सुनीतिर्लोकपालनम् ॥
पञ्चकर्माधिकारित्वं क्षात्रं कर्म समीरितम् ॥ ३१ ॥
दृढपणा, शौर्य, दक्षता, युद्धामध्ये पाठ न दाखविणे, शरणागताचे पालन करणे, दान, धैर्य, स्वाभाविक तेज, प्रभुत्व, मनाचा मोठेपणा, उत्तम राजकारण, लोकपालन, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन् आणि दान या पांच कर्माचा अधिकार असणे याला क्षत्रियाचे कर्म म्हटले आहे. ३०-३१.

नानावस्तुक्रयो भूमेः कर्षणं रक्षणं गवाम् ॥
त्रिधा कर्माधिकारित्वं वैश्यकर्म समीरितम् ॥ ३२ ॥
नाना वस्तूंची खरेदी, शेतकी, गोरक्षण, यज्ञ, वेदाध्ययन आणि दान या तीन कर्माचा अधिकार असणे याला वैश्यांचे कर्म म्हटले आहे. ३२.

दानं द्विजानां शुश्रूषा सर्वदा शिवसेवनम् ॥
एतादृशं नरव्याघ्र कर्म शौद्रमुदीरितम् ॥ ३३ ॥
दान, द्विजांची शुश्रूषा, सर्वदा शिवाची सेवा अशा प्रकारच्या कर्माला, हे नरश्रेष्ठा, शूद्राचे कर्म झटलें आहे. ३३.

स्वस्वकर्मरता एते मय्यर्प्याखिलकारिणः ॥
मत्प्रसादात्स्थिरं स्थानं यान्ति ते परमं नृप ॥ ३४॥
आपआपल्या कर्माचे ठिकाणीं रत असणारे माझ्या ठिकाणी सर्व अर्पण करून कर्म करणारे असल्यामुळे माझ्या प्रसादाने शाश्वत व अत्यंत स्थिर अशा स्थानाला जातात. ३४.

इति ते कथितो राजन्प्रसादाद्योग उत्तमः ॥
सांगोपांगः सविस्तारोऽनादिसिद्धो मया प्रिय ॥ ३५ ॥
हे प्रिय राजा, या प्रकारे मी प्रसन्न झाल्यामुळे अंगें व उपांगे यांसह, विस्तारयुक्त व अनादिसिद्ध असा उत्तम योग मी तुला सांगितला. ३५.

युङ्क्ष्व योगं मयाख्यातं नाख्यातं कस्यचिन्नृप ॥
गोपयैनं ततः सिद्धिं परां यास्यस्यनुत्तमाम् ॥ ३६ ॥
हे नृपा, पूर्वी कोणाला न सांगितलेल्या पण तुला सांगितलेल्या या योगाने युक्त हो. या योगाचे रक्षण कर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ व अत्यंत उत्तम अशी सिद्धि पावशील. ३६.

व्यास उवाच -
इति तस्य वचः श्रुत्वा प्रसन्नस्य महात्मनः ॥
गणेशस्य वरेण्यः स चकार च यथोदितम् ॥ ३७ ॥
व्यास म्हणतात, प्रसन्न झालेल्या महात्म्या गणेशाचे या प्रकारचे भाषण श्रवण केल्यावर त्या वरेण्याने सांगितल्याप्रमाणे केलें. ३७.

त्यक्त्वा राज्यं कुटुम्बं च कान्तारं प्रययौ रयात् ॥
उपदिष्टं यथा योगमास्थाय मुक्तिमाप्तवान् ॥ ३८ ॥
राज्य आणि कुटुंब यांना टाकून तो एकदम वनांत गेला. उपदेश केल्याप्रमाणे योगाचे आचरण करून त्याने मुक्ति मिळविली. ३८.

इमं गोप्यतमं योगं शृणोति श्रद्धया तु यः ॥
सोऽपि कैवल्यमाप्नोति यथा योगी तथैव सः ॥ ३९ ॥
अत्यंत रक्षणीय असा हा योग जो श्रद्धेनें श्रवण करील त्याला देखील मोक्ष प्राप्त होईल. जसा योगी तसाच तो. ३९.

य इमं श्रावयेद्योगं कृत्वा स्वार्थं सुबुद्धिमान् ॥
यथा योगी तथा सोऽपि परं निर्वाणमृच्छति ॥ ४० ॥
आपला अर्थ करून (म्हणजे स्वतः योग आचरण करून) जो बुद्धिमान् मनुष्य हा योग दुसर्‍यांकडून श्रवण करवितो तो परम मोक्ष पावतो. जसा योगी तसाच तो. ४०.

यो गीतां सम्यगभ्यस्य ज्ञात्वा चार्थं गुरोर्मुखात् ॥
कृत्वा पूजां गणेशस्य प्रत्यहं पठते तु यः ॥ ४१ ॥
एककालं द्विकालं वा त्रिकालं वापि यः पठेत् ॥
ब्रह्मीभूतस्य तस्यापि दर्शनान्मुच्यते नरः ॥ ४२ ॥
जो गीतेचा चांगला अभ्यास करून आणि गुरूच्या मुखानें अर्थ जाणून प्रत्यहीं गणेशाची पूजा केल्यावर एककाल, द्विकाल अथवा त्रिकाल पठण करतो तो ब्रह्मरूप झालेला जाणावा. त्याच्या दर्शनाने देखील मनुष्याला मुक्ति मिळेल. ४१-४२.

न यज्ञैर्न व्रतैर्दानैर्नाग्निहोत्रैर्महाधनैः ॥
न वेदैः सम्यगभ्यस्तैः सम्यग्ज्ञातैः सहाङ्‌गकैः ॥ ४३ ॥
पुराणश्रवणैर्नैव न शास्त्रैः साधुचिन्तितैः ॥
प्राप्यते ब्रह्म परममनया प्राप्यते नरैः ॥ ४४ ॥
यज्ञांनी, व्रतांनी, दानांनी, संपत्तीने युक्त अशा अग्निहोत्रांनीं, उत्तम प्रकारे अभ्यास केलेल्या व अंगांसह उत्तम प्रकारे जाणलेल्या वेदांनीं मनुष्यांना परम ब्रह्म प्राप्त होत नाही. या गीतेने तें प्राप्त होते. ४३-४४.

ब्रह्मघ्नो मद्यपः स्तेयी गुरुतल्पगमोऽपि यः ॥
चतुर्णां यस्तु संसर्गी महापातककारिणाम् ॥ ४५ ॥
स्त्रीहिंसागोवधादीनां कर्तारो ये च पापिनः ॥
ते सर्वे प्रतिमुच्यन्ते गीतामेतां पठन्ति चेत् ॥ ४६ ॥
ब्रह्महत्या करणारा, मद्यपी, चोर, गुरुतल्पग, ही चार महापातकें करणारांशी संबंध ठेवणारा, स्त्रीहिंसा-गोवध वगैरे करणारे पापी असे सर्व जर ही गीता पठन करतील तर मुक्त होतील. ४५-४६.

यः पठेत्प्रयतो नित्यं स गणेशो न संशयः ॥
चतुर्थ्यां यः पठेद्‌भक्त्या सोऽपि मोक्षाय कल्पते ॥ ४७ ॥
जो यमाने युक्त होत्साता नित्य या गीतेचे पठन करील तो गणेशच होय यांत संशय नाहीं. चतुर्थीचे दिवशीं जो भक्तीने पठन करील तो देखील मोक्षाचा अधिकारी होईल. ४७.

तत्तत्क्षेत्रं समासाद्य स्नात्वाभ्यर्च्य गजाननम् ॥
सकृद्‌गीतां पठन्भक्त्या ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ४८ ॥
एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊन स्नान करून गजाननाची पूजा केल्यावर भक्तीने एकदां गीता पठण करील तो ब्रह्मस्वरूपाला योग्य होतो. ४८.

भाद्रे मासे सिते पक्षे चतुर्थ्यां भक्तिमान्नरः ॥
कृत्वा महीमयीं मूर्तिं गणेशस्य चतुर्भुजाम् ॥ ४९ ॥
सवाहनां सायुधां च समभ्यर्च्य यथाविधि ॥
यः पठेत्सप्तकृत्वस्तु गीतामेतां प्रयत्‍नतः ॥ ५० ॥
ददाति तस्य सन्तुष्टो गणेशो भोगमुत्तमम् ॥
पुत्रान्पौत्रान्धनं धान्यं पशुरत्‍नादिसंपदः ॥ ५१ ॥
भाद्रपदमास शुद्ध पक्षी चतुर्थीला जो भक्तिमान् मनुष्य चतुर्भुज, वाहनयुक्त व आयुधयुक्त अशी गणेशाची मातीची मूर्ति करून यथाविधि पूजा केल्यावर ही गीता लक्षपूर्वक सात वेळां पठण करतो त्याला गणेश संतुष्ट होऊन पुत्र, पौत्र, धन, धान्य, पशु, रत्नादि संपत्ति इत्यादि उत्तम भोग देतो. ४९-५१.

विद्यार्थिनो भवेद्विद्या सुखार्थी सुखमाप्नुयात् ॥
कामानन्याँल्लभेत्कामी मुक्तिमन्ते प्रयान्ति ते ॥ ५२ ॥
विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होईल, सुखार्थ्याला सुख प्राप्त होईल, इच्छायुक्त मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतील आणि ते सर्व अंतीं मोक्ष पावतील. ५२.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे
त्रिविधवस्तुविवेकनिरूपणं नाम एकादशोऽध्यायः ॥
॥ इति गणेश गीता समाप्ता ॥
त्रिविधवस्तुविवेकनिरूपण नामक अकरावा अध्याय समाप्त ॥ ११ ॥
॥ गणेशगीता समाप्त झाली ॥



॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
Main Page(मुख्य पान )