Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ प्रथमोऽध्यायः

अध्याय पहिला - सांख्यसारार्थयोग॥


शुक उवाच -
एवमेव पुरा पृष्टः शौनकेन महात्मना ।
स सूतः कथयामास गीतां व्यासमुखाच्छ्रुताम् ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे महात्म्या शौनकानें प्रश्न
केल्यावरून तो सूत ऋषि व्यासाच्या मुखांतून श्रवण
केलेली गीता सांगता झाला. १.


सूत उवाच -
अष्टादशपुराणोक्तममृतं प्राशितं त्वया ।
ततोऽतिरसवत्पातुमिच्छाम्यमृतमुत्तमम् ॥ २ ॥
सूत म्हणाले, अठरा पुराणांमध्ये तू सांगितलेलें अमृत मीं
प्राशन केले. त्याच्याहून मधुरतर असे उत्तम अमृत प्राशन
करण्याची माझी इच्छा आहे. २.


येनामृतमयो भूत्वा पुमान्ब्रह्मामृतं यतः ।
योगामृतं महाभाग तन्मे करुणया वद ॥ ३ ॥
ज्याच्या योगाने पुरुष अमृतमय होऊन ब्रह्मस्वरूपी अमृताप्रत
जातो तें योगामृत, हे महाभागा, कृपा करून मला सांगा. ३.


व्यास उवाच - अथ गीतां प्रवक्ष्यामि योगमार्गप्रकाशिनीम् ।
नियुक्ता पृच्छते सूत राज्ञे गजमुखेन या ॥ ४ ॥
व्यास म्हणाले, हे सुता, असाच प्रश्न करणा या वरेण्य राजाला
गजाननाने जी गीता सांगितली ती योगमार्ग प्रकाशित करणारी
गीता आता मी तुला सांगतो. ४.


वरेण्य उवाच - विघ्नेश्वर महाबाहो सर्वविद्याविशारद ।
सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ योगं मे वक्तुमर्हसि ॥ ५ ॥
वरेण्य म्हणाले , हे विघ्नेश्वरा, सामर्थ्यसंपन्ना, महाबाहु
सर्व विद्या उत्तम प्रकारे जाणणा या, सर्व शास्त्रांच्या अर्थाचे
तत्त्व जाणणार्‍या, मला योग सांगण्याला तू योग्य आहेस. ५.


श्रीगजानन उवाच -
सम्यग्व्यवसिता राजन्मतिस्तेऽनुग्रहान्मम ।
शृणु गीतां प्रवक्ष्यामि योगामृतमयीं नृप ॥ ६ ॥
श्रीगजानन म्हणाले , हे राजन् माझ्या अनुग्रहामुळे तुझी
बुद्धि योग्य मार्गाला लागली, राजा, योगामृतरूपी गीता
मी सांगतो ती श्रवण कर. ६.


न योगं योगमित्याहुर्योगो योगो न च श्रियः ।
न योगो विषयैर्योगो न च मात्रादिभिस्तदा ॥ ७ ॥
कोणत्याहि वस्तूशीं योग होणे याला योग म्हणत नाहीत,
संपत्तीशी योग होणे याला योग म्हणत नाहींत,
विषयांशीं योग होणे याला योग म्हणत नाहीत,
इंद्रियांशीं योग होणे याला योग म्हणत नाहींत. ७.


योगो यः पितृमात्रादेर्न स योगो नराधिप ।
यो योगो बन्धुपुत्रादेर्यश्चाष्टभूतिभिः सह ॥ ८ ॥
हे राजा, माता, पिता इत्यादिकांशीं योग होणे हा
योग नव्हे; बंधु, पुत्र इत्यादिकांशीं योग होणे हा योग नव्हे;
अष्टसिद्धींशीं योग होणे हा योग नव्हे. ८.


न स योगस्त्रिया योगो जगदद्भुतरूपया ।
राज्ययोगश्च नो योगो न योगो गजवाजिभिः ॥ ९ ॥
जगामध्ये अलौकिक अशा स्वरूपाच्या स्त्रीशीं योग होणे हा
योग नव्हे. राज्ययोग हा योग नव्हे. हत्ती अथवा अश्व यांचा
योग हा योग नव्हे ९.


योगो नेन्द्रपदस्यापि योगो योगार्थिनः प्रियः ।
योगो यः सत्यलोकस्य न स योगो मतो मम ॥१०॥
योगप्राप्ति इच्छिणाराला इंद्रपदाचा योग हा योग देखील
प्रिय नाहीं. सत्यलोकाची प्राप्त होणे हा देखील योग
नव्हे असे मी समजतों. १०.


शैवस्य योगो नो योगो वैष्णवस्य पदस्य यः ।
न योगो भूप सूर्यत्वं चन्द्रत्वं न कुबेरता ॥ ११ ॥
नानिलत्वं नानलत्वं नामरत्वं न कालता ।
न वारुण्यं न नैर्ऋत्यं योगो न सार्वभौमता ॥१२ ॥
शिवपद अथवा विष्णुपद यांची प्राप्ति होणे हा योग नव्हे.
हे राजा, सूर्यत्व, चंद्रत्व, कुबेरत्व, वायुत्व, अग्नत्व,
अमरत्व, यमत्व, वरुणत्व, नैर्ऋत्य अथवा सार्वभौमता
ही योग नव्हेत. ११-१२.


योगं नानाविधं भूप युञ्जन्ति ज्ञानिनस्ततम् ।
भवन्ति वितृषा लोके जिताहारा विरेतसः ॥ १३ ॥
हे राजा, योग नाना प्रकारचा आहे व त्याची प्राप्ति ज्ञानी
जनांना होते. योगयुक्त झालेले ज्ञानी जगताविषयी निरिच्छ
होतात, आहार आपल्या स्वाधीन ठेवतात,ऊर्ध्वरेते होतात. १३.


पावयन्त्यखिलान्लोकान्वशीकृतजगत्त्रयाः ।
करुणापूर्णहृदया बोधयन्त्यपि कांश्चन ॥ १४ ॥
त्रैलोक्याला वश करणारे ते योगी सकल जनांना पावन
करतात.त्यांचे हृदय करुणेनें पूर्ण असल्यामुळे ते
पुष्कळांना योगाचे ज्ञान देतात. १४.


जीवन्मुक्ता ह्रदे मग्नाः परमानन्दरूपिणि ।
निमील्याक्षीणि पश्यन्तः परं ब्रह्म हृदि स्थितम् ॥१५॥
ते जीवन्मुक्त असतात व परमानंदसागरामध्ये मग्न
असतात. डोळे मिटून देखील परब्रह्म
[अत्यंत श्रेष्ठ असे ब्रह्म] आपल्या हृदयामध्ये पहातात. १५.


ध्यायन्तः परमं ब्रह्म चित्ते योगवशीकृतम् ।
भूतानि स्वात्मना तुल्यं सर्वाणि गणयन्ति ते ॥ १६॥
योगाने वश केलेल्या त्या परब्रह्माचे आपल्या
चित्तामध्ये ध्यान करतात. सर्व जीवांना ते
स्वतःच्या समान समजतात. १६.


येन केनचिदाच्छिन्ना येन केनचिदाहताः ।
येन केनचिदाकृष्टा येन केनचिदाश्रिताः ॥ १७ ॥
करुणापूर्णहृदया भ्रमन्ति धरणीतले ।
अनुग्रहाय लोकानां जितक्रोधा जितेन्द्रियाः ॥ १८ ॥
कशाने तरी आच्छादन केलेले, कशा तरी अन्नावर
निर्वाह केलेले, कोणत्या तरी निमित्ताने आकर्षित
झालेले आणि कशाचा तरी आश्रय करून रहाणारे,
करुणेने ज्यांचे हृदय भरलेले आहे असे ते योगी
भूतमात्रावर अनुग्रह करण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर
भ्रमण करतात. त्यांनी क्रोध जिंकलेला असतो,
इंद्रियें जिंकलेली असतात. १७-१८.


देहमात्रभृतो भूप समलोष्टाश्मकाञ्चनाः ।
एतादृशा महाभाग्याः स्युश्चक्षुर्गोचराः प्रिय ॥ १९ ॥
तमिदानीमहं वक्ष्ये शृणु योगमनुत्तमम् ।
श्रुत्वा यं मुच्यते जन्तुः पापेभ्यो भवसागरात् ॥ २०
ते केवळ देह तेवढा धारण करतात. मातीचे ढेकूळ,
दगड आणि सोने यांची त्यांना सारखीच किंमत आहे.
हे माझ्या प्रिय राजा, अशा त हेचे महाभाग योगी
ज्याच्या योगाने दृष्टीस पडतात असा हा अत्यंत उत्तम
योग मी तुला सांगतों ऐक. जो ऐकल्याने पापांपासून
व भवसागरापासून प्राणी मुक्त होतो. १९-२०.


शिवे विष्णौ च शक्तौ च सूर्ये मयि नराधिप ।
याऽभेदबुद्धिर्योगः स सम्यग्योगो मतो मम ॥ २१ ॥
हे राजा, शिव, विष्णु, आदिशक्ति (देवी), सूर्य
आणि मी यांचे ठिकाण भेदबुद्धि नसणे हा जो योग
तोच उत्तम योग असे माझे मत आहे. २१.


अहमेव जगद्यस्मात्सृजामि पालयामि च ।
कृत्वा नानाविधं वेषं संहरामि स्वलीलया ॥ २२ ॥
कारण आपल्या लीलेने नाना प्रकारचे रूप धारण
करून मीच जगाची उत्पत्ति करतों, पालन करतों
व संहार करतों. २२.


अहमेव महाविष्णुरहमेव सदाशिवः ।
अहमेव महाशक्तिरहमेवार्यमा प्रिय ॥ २३ ॥
हे प्रिया, मीच महाविष्णु आहे, मीच सदाशिव आहे,
मीच महाशक्ति आहे, मीच सूर्य आहे. २३.


अहमेको नृणां नाथो जातः पञ्चविधः पुरा ।
अज्ञानान्मा न जानन्ति जगत्कारणकारणम् ॥ २४ ॥
मीच एक भूतांचा स्वामी पूर्वी पांच प्रकारचा झालो.
जगताचे आदिकारण असलेल्या मला लोक
अज्ञानामुळे जाणत नाहींत. २४.


मत्तोऽग्निरापो धरणी मत्त आकाशमारुतौ ।
ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च लोकपाला दिशो दश ॥ २५ ॥
वसवो मनवो गावो मनवः पशवोऽपि च ।
सरितः सागरा यक्षा वृक्षाः पक्षिगणा अपि ॥ २६ ॥
तथैकविंशतिः स्वर्गा नागाः सप्त वनानि च ।
मनुष्याः पर्वताः साध्याः सिद्धा रक्षोगणास्तथा ॥ २७ ॥
अग्नि माझ्यापासून उत्पन्न झाला, उदक माझ्यापासून उत्पन्न
झाले, पृथ्वी माझ्यापासून उत्पन्न झाली, आकाश, वायु,
ब्रह्मा, विष्णु, रुद्र, इंद्रादि लोकपाल, दहा दिशा, अष्टवसु,
चवदा मनु, गाई, मुनि, पशु, नद्या, समुद्र, यक्ष, वृक्ष,
पाक्षगण, तसेच एकवीस स्वर्ग, नऊ नाग, सात वने,
मनुष्य, पर्वत, साध्य, सिद्ध, राक्षससमुदाय, हे सर्व
माझ्यापासून उत्पन्न झाले. २५-२७.


अहं साक्षी जगच्चक्षुरलिप्तः सर्वकर्मभिः ।
अविकारोऽप्रमेयोऽहमव्यक्तो विश्वगोऽव्ययः ॥ २८॥
मी सर्वांचा साक्षी आहे, सर्व जग मला दिसतें
[जग माझ्या चक्षुचा विषय आहे ], मी सर्व
कर्मापासून अलिप्त आहे, निर्विकार, अप्रमेय -
ज्याची इयत्ता करता येत नाही असा, अव्यक्त -
ज्याचे यथार्थ स्वरूप कोणाला कळत नाही असा],
सर्वव्यापी व अव्यय [ =नाशरहित ] आहे. २८.


अहमेव परं ब्रह्माव्ययानन्दात्मकं नृप ।
मोहयत्यखिलान्माया श्रेष्ठान्मम नरानमून् ॥ २९ ॥
हे राजा, अव्यय व आनंदरूपी परब्रह्म मी आहे.
माझी माया या सर्व श्रेष्ठ जनांना देखील मोहित करते. २९.


सर्वदा षड्विकारेषु तानियं योजयेत् भृशम् ।
हित्वाजापटलं जन्तुरनेकैर्जन्मभिः शनैः ॥ ३० ॥
विरज्य विन्दति ब्रह्म विषयेषु सुबोधतः ।
अच्छेद्यं शस्त्रस घातैरदाह्यमनलेन च ॥ ३१ ॥
ही सर्वदा त्यांना कामक्रोधादि सहा विकारांचे ठिकाणी
अत्यंत युक्त करते. अनेक जन्मांमध्ये हळु हळु
मायापटलाचा [अजा=माया=जन्मरहित ] त्याग करून
प्राणी विषयांचे ठिकाणी विरक्त झाल्यावर उत्तम
ज्ञानाच्या योगानें ब्रह्म पावतो. ते ब्रह्म शस्त्रसंघातांनी
छेदन करण्यास अशक्य आहे, अग्नीने दहन करण्यास
अशक्य आहे. ३०-३१.


अक्लेद्यं भूप भुवनैरशोष्यं मारुतेन च ।
अवध्यं वध्यमानेऽपि शरीरेऽस्मिन्नराधिप ॥ ३२ ॥
हे राजा, जलाने [ भुवनं = पाणी ] भिजविण्यास अशक्य,
वायूने शोषण्यास अशक्य, हे राजा, या वध करतां येणा या
शरीरामध्ये देखील वध करण्यास अशक्य असे हें ब्रह्म आहे. ३२,


यामिमां पुष्पितां वाचं प्रशंसन्ति श्रुतीरिताम् ।
त्रयीवादरता मूढास्ततोऽन्यन्मन्वतेऽपि न ॥ ३३ ॥
कुर्वन्ति सततं कर्म जन्ममृत्युफलप्रदम् ।
स्वर्गैश्वर्यरता ध्वस्तचेतना भोगबुद्धयः ॥ ३४ ॥
सम्पादयन्ति ते भूप स्वात्मना निजबन्धनम् ।
संसारचक्रं युञ्जन्ति जडाः कर्मपरा नराः ॥ ३५ ॥
वेदांनीं [ वेदांतील विधिवाक्यांनी] सांगितलेल्या व पुष्पांप्रमाणे
मनोहर भासणाच्या या कर्मविषयक वचनांची जे प्रशंसा करतात,
जे मूढ वेदांसंबंधीं वादामध्ये रत् असतात, त्याखेरीज इतर कांहीं
आहे असे मानीत नाहीत, जन्म-मृत्युरूपी फल देणारे कर्म सतत
करतात, स्वर्गाच्या ऐश्वर्यामध्ये रममाण असणारे, ज्ञान नष्ट झालेले,
विषयांच्या भोगांचे ठिकाण बुद्धि ठेवणारे असे जे असतात ते,
हे राजा, स्वतःच स्वतःचे बंधन तयार करतात. ते मंद कर्मपरायण
मनुष्य स्वतःला फिरण्याकरितां संसाररूपी चक्र जोडतात. ३३-३५.


यस्य यद्विहितं कर्म तत्कर्तव्यं मदर्पणम् ।
ततोऽस्य कर्मबीजानामुच्छिन्नाः स्युर्महाङ्कुराः ॥ ३६ ॥
ज्याचें जें धर्माने विहित कर्म असेल ते त्याने मला अर्पण करावे.
तेणेकरून त्याचे कर्मबीजांचे मोठे मोठे फल देणारे अंकुर तुटून
जातील. ३६


चित्तशुद्धिश्च महती विज्ञानसाधिका भवेत् ।
विज्ञानेन हि विज्ञातं परं ब्रह्म मुनीश्वरैः ॥ ३७ ॥
विज्ञान [अनुभवयुक्त ज्ञान] साधून देणारी चांगली चित्तशुद्धि
होईल. मुनिश्रेष्ठांनीं विज्ञानाचेच योगाने श्रेष्ठ [ परं] ब्रह्म जाणले. ३७.


तस्मात्कर्माणि कुर्वीत बुद्धियुक्तो नराधिप ।
न त्वकर्मा भवेत्कोऽपि स्वधर्मत्यागवांस्तथा ॥ ३८ ॥
म्हणून हे राजा, बुद्धिमान् मनुष्याने मर्दपण अथवा निष्काम
कमें करावी, तसेच कोणी अकर्मी होऊ नये, स्वधर्मत्यागी
होऊ नये. ३८.


जहाति यदि कर्माणि ततः सिद्धिं न विन्दति ।
आदौ ज्ञाने नाधिकारः कर्मण्येव स युज्यते ॥ ३९ ॥
जर कर्मांचा त्याग करील तर सिद्धि पावणार नाहीं.
अगोदर ज्ञानाला अधिकार नाहीं, कर्माचेच ठिकाणी
तो योग्य असतो. ३९.


कर्मणा शुद्धहृदयोऽभेदबुद्धिमुपैष्यति ।
स च योगः समाख्यातोऽमृतत्वाय कल्पते ॥ ४० ॥
कर्माने शुद्धचित्त होत्साता जीव व ब्रह्म यांच्या ठिकाणी
अभेदबुद्धि पावेल. हाच 'योग' म्हणून प्रसिद्ध आहे,
हाच मोक्षाला साधन आहे. ४०.


योगमन्यं प्रवक्ष्यामि शृणु भूप तमुत्तमम् ।
पशौ पुत्रे तथा मित्रे शत्रौ बन्धौ सुहृज्जने ॥ ४१ ॥
बहिर्दृष्ट्या च समया हृत्स्थयालोकयेत्पुमान् ।
सुखे दुःखे तथाऽमर्षे हर्षे भीतौ समो भवेत् ॥ ४२ ॥
मी आतां दुसरा योग सांगतो. है राजा, तो उत्तम योग ऐक,
पशु, पुत्र, तसाच मित्र, शत्रू, बंधु, सुहृज्जन यांचे ठिकाणी
असणार्‍या बाह्य दृष्टीप्रमाणेच [समया] हृदयस्थ दृष्टीनेहि
मनुष्याने पहावे. सुख-दुःख, तसाच क्रोध, हर्ष, भीति यांचे
ठिकाणीं समान असावें. ४१-४२.


रोगाप्तौ चैव भोगाप्तौ जये वा विजयेऽपि च ।
श्रियोऽयोगे च योगे च लाभालाभे मृतावपि ॥ ४३ ॥
रोगप्राप्ति अथवा भोगप्राप्ति, जय अथवा पराजय, ऐश्वर्याची
अप्राप्ति अथवा प्राप्ति, लाभ-अलाभ अथवा मृत्यु यांचे
ठिकाणी समान दृष्टि असावी. ४३.


समो मां वस्तुजातेषु पश्यन्नन्तर्बहिःस्थितम् ।
सूर्ये सोमे जले वह्नौ शिवे शक्तौ तथानिले ॥ ४४ ॥
द्विजे हृदि महानद्यां तीर्थे क्षेत्रेऽघनाशिनि ।
विष्णौ च सर्वदेवेषु तथा यक्षोरगेषु च ॥ ४५ ॥
गन्धर्वेषु मनुष्येषु तथा तिर्यग्भवेषु च ।
सततं मां हि यः पश्येत्सोऽयं योगविदुच्यते ॥ ४६ ॥
सर्व वस्तुमात्राचे ठिकाणी आंत व बाहेर मी सारखा राहिलो
आहे असा मला पहाणारा सूर्य, चंद्र, उदक, अग्नि, शिव,
शक्ति, वायु, ब्राह्मण, हृदय, महानदी, तीर्थ, पापनाशक क्षेत्र,
विष्णु, सर्व देव, यक्ष, नाग, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादि
तिर्यग्योनि यांचे ठिकाण मी स्थित आहे असे सतत जो मला
पहातो त्याला योगावित् [= योगज्ञानी = योगी ] म्हणतात. ४४-४६.


संपराहृत्य स्वार्थेभ्य इन्द्रियाणि विवेकतः ।
सर्वत्र समताबुद्धिः स योगो भूप मे मतः ॥ ४७ ॥
आपापल्या शब्द, स्पर्श इत्यादि अर्थांपासून इंद्रिये विवेकाचे
योगाने मागे ओढून घेऊन सर्वत्र समत्वबुद्धि ठेवणें हा योग,
हे राजा, मला संमत आहे. ४७.


आत्मानात्मविवेकेन या बुद्धिर्दैवयोगतः ।
स्वधर्मासक्तचित्तस्य तद्योगो योग उच्यते ॥ ४८ ॥
स्वधर्माचे ठिकाणी चित्त आसक्त असलेल्या मनुष्याला दैवयोगाने
व आत्मानात्मविवेकानें जी बुद्धि होते त्या योगाला योग म्हणतात. ४८


धर्माधर्मौ जहातीह तया युक्त उभावपि ।
अतो योगाय युञ्जीत योगो वैधेषु कौशलम् ॥ ४९ ॥
या बुद्धीने युक्त असलेला मनुष्य इहलोकीं धर्म व अधर्म या
दोहोंचाहि [म्ह० दोहोंच्या फलांचा ] त्याग करतो. म्हणून,
योगाची जोड करून घे. योग म्हणजे विधिपूर्वक
कर्माचे ठिकाणी कुशलता. ४९.


धर्माधर्मफले त्यक्त्वा मनीषी विजितेन्द्रियः ।
जन्मबन्धविनिर्मुक्तः स्थानं संयात्यनामयम् ॥ ५० ॥
धर्म व अधर्म यांच्या फलांचा त्याग करून, मन जिंकलेला
व इंद्रियें जिंकलेला मनुष्य जन्मबंधनापासून मुक्त होत्साता
कल्याणप्रद अनामयं स्थानाला [ म्ह० मोक्षाला ] जातो. ५०


यदा ह्यज्ञानकालुष्यं जन्तोर्बुद्धिः क्रमिष्यति ।
तदासौ याति वैराग्यं वेदवाक्यादिषु क्रमात् ॥ ५१ ॥
जेव्हां मनुष्याची बुद्धि अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या कलुषतेला
आक्रमण करील तेव्हां वेदांतील विधिवाक्यादिकांचे ठिकाण याला
क्रमानें वैराग्य प्राप्त होईल. ५१.


त्रयीविप्रतिपन्नस्य स्थाणुत्वं यास्यते यदा ।
परात्मन्यचला बुद्धिस्तदासौ योगमाप्नुयात् ॥ ५२ ॥
तीन वेदांनीं [ त्रयी] परस्परविसंगत अशा रीतीनें सांगितलेल्या
कर्माचे ठिकाणी जेव्हां निश्चलत्व [स्थाणुत्व] येईल व परमात्म्याचे
ठिकाणी निश्चल बुद्धि येईल तेव्हां त्याला योगाची प्राप्ति होईल. ५२.


मानसानखिलान्कामान्यदा धीमांस्त्यजेत्प्रिय ।
स्वात्मनि स्वेन सन्तुष्टः स्थिरबुद्धिस्तदोच्यते ॥ ५३ ॥
हे प्रिया, जेव्हां बद्धिमान् मनुष्य मनाच्या सर्व इच्छा सोडतो व
स्वतःचे ठिकाणी स्वतः संतुष्ट होतो तेव्हां त्याला स्थिरप्रज्ञ
( अथवा स्थिरबुद्धि ) म्हणतात. ५३.


वितृष्णः सर्वसौख्येषु नोद्विग्नो दुःखस गमे ।
गतसाध्वसरु रागः स्थिरबुद्धिस्तदोच्यते ॥ ५४ ॥
सर्व सुखांचे ठिकाणी इच्छाहीन, दुःखप्राप्तीचे ठिकाण उद्वेगहीन,
ज्याची भीति-क्रोध व काम निघून गेली आहेत त्याला स्थिरबुद्धि
म्हणतात. ५४.


यथाऽयं कमठोऽङ्‌गानि संकोचयति सर्वतः ।
विषयेभ्यस्तथा खानि संकर्षेद्योगतत्परः ॥ ५५ ॥
ज्याप्रमाणे कांसव सर्व बाजूंनी आपल्या इद्रियांचा संकोच करतो,
त्याप्रमाणे योगतत्पर मनुष्याने आपल्या इंद्रियांचे विषयांपासून
आकर्षण करावे. ५५.


व्यावर्तन्तेऽस्य विषयास्त्यक्ताहारस्य वर्ष्मिणः ।
विना रागं च रागोऽपि दृष्ट्‍वा ब्रह्म विनश्यति ॥ ५६ ॥
ज्याने विषयांचे सेवन [आहारः ] टाकले आहे त्या मनुष्याचे
[वर्ष्मिणः] विषय परत येत नाहींत, त्यांविषयींची इच्छा मात्र
परत येते. ही इच्छा ब्रह्मदर्शन झाल्यावर नाश पावते. ५६.


विपश्चिद्यतते भूप स्थितिमास्थाय योगिनः ।
मन्थयित्वेन्द्रियाण्यस्य हरन्ति बलतो मनः ॥ ५७ ॥
हे राजा, शहाणा मनुष्य योगाच्या मार्गाचा अथवा स्थितीचा
अवलंब करून वैराग्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो.
परंतु त्याची इंद्रिये खळबळ करून बलात्काराने त्याचे
मन विषयांकडे ओढतात. ५७.


युक्तस्तानि वशे कृत्वा सर्वदा मत्परो भवेत् ।
संयतानीन्द्रियाणीह यस्यासौ कृतधीर्मतः ॥ ५८ ॥
योग्याने त्यांना ताब्यात ठेवून सर्वदा मत्पर [ माझ्या ठिकाणी
चित्त असलेला ] व्हावें. ज्याचीं इंद्रियें नियंत्रित असतात त्याला
या लोकीं कृतबुद्धि अथवा स्थितबुद्धि म्हणतात. ५८.


चिन्तयानस्य विषयान्संगस्तेषूपजायते ।
कामः संजायते तस्मात्ततः क्रोधोऽभिवर्तते ॥ ५९ ॥
विषयांचे चिंतन करणाराला त्यांचे ठिकाणी आसक्ति उत्पन्न होते.
तीपासून काम उत्पन्न होतो. त्यापासून क्रोध वृद्धि पावतो. ५९.


क्रोधादज्ञानसंभूतिर्विभ्रमस्तु ततः स्मृतेः ।
भ्रंशात्स्मृतेर्मतेर्ध्वंसस्तद्ध्वंसात्सोऽपि नश्यति ॥ ६० ॥
क्रोधापासून अज्ञानाची उत्पत्ति होते, त्यापासून स्मृतिविभ्रम उत्पन्न
होतो, स्मृतीच्या भ्रंशापासून बुद्धीचा नाश होतो, आणि त्या
नाशापासून तो मनुष्य नाश पावतो. ६०.


विना द्वेषं च रागं च गोचरान्यस्तु खैश्चरेत् ।
स्वाधीनहृदयो वश्यैः संतोषं स समृच्छति ॥ ६१ ॥
अप्रीति [द्वेष] अथवा प्रीति [राग] यांनी रहित, अंतःकरण
स्वाधीन असलेला, आपल्या ताब्यात असलेल्या [वश्यैः]
इंद्रियांनी [खैः] जो विषयांचे [ गो=इंद्रिय, गोचर=विषय ]
सेवन करतो [ चरेत् ] तो समाधान पावतो. ६१.


त्रिविधस्यापि दुःखस्य संतोषे विलयो भवेत् ।
प्रज्ञया संस्थितश्चायं प्रसन्नहृदयो भवेत् ॥ ६२ ॥
आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन
प्रकारच्या दुःखाचा समाधानामध्ये लय होतो. प्रज्ञेनें स्थित
[=स्थिरबुद्धि= स्थितप्रज्ञ] असला म्हणजे प्रसन्नचित्त होतो. ६२.


विना प्रसादं न मतिर्विना मत्या न भावना ।
विना तां न शमो भूप विना तेन कुतः सुखम् ॥ ६३ ॥
समाधान [=प्रसन्नता=प्रसाद] असल्यावांचून बुद्धि नाहीं,
बुद्धीवांचून भावना नाहीं,भावनेवांचून शांति नाहीं, हे राजा,
शांतीवांचून सुख कोठले ? ६३.


इन्द्रियाश्वान्विचरतो विषयाननु वर्तते ।
यन्मनस्तन्मतिं हन्यादप्सु नावं मरुद्यथा ॥ ६४ ॥
विषयांमध्ये संचार करणा या [विचरतः ] इंद्रियरूपी
अश्वांना अनुसरून जे मन चालतें तें मन पाण्यामध्ये
संचार करणा या नावेला जसा वायु नष्ट करतो
त्याप्रमाणे-बुद्धीचा नाश करते. ६४.


या रात्रिः सर्वभूतानां तस्यां निद्राति नैव सः ।
न स्वपन्तीह ते यत्र सा रात्रिस्तस्य भूमिप ॥ ६५ ॥
सर्व प्राणिमात्राची जी रात्र तिच्यामध्ये तो कधीं निद्रा पावत
नाही. या लोकीं जेथे म्ह० ज्या गोष्टींसंबंधानें ते निद्रा घेत
नाहींत ती हे राजा, त्याची रात्र होय.म्ह० त्या गोष्टींकडे
तो लक्ष देत नाहीं. ६५.


सरितां पतिमायान्ति वनानि सर्वतो यथा ।
आयान्ति यं तथा कामा न स शान्तिं क्वचिल्लभेत् ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे सर्व बाजूनी उदक [वनानि] सरितानाथाकडे,
सागराकडे येते त्याप्रमाणे त्याच्याकडे सर्व काम [ इच्छा ]
येतात, तथापि कोणापासूनहि [क्वचित् ] त्याला शान्ति
प्राप्त होत नाहीं. ६६.


अतस्तानीह संरुध्य सर्वतः खानि मानवः ।
स्वस्वार्थेभ्यः प्रधावन्ति बुद्धिरस्य स्थिरा तदा ॥ ६७ ॥
म्हणून इहलोकीं मनुष्याने आपआपल्या अर्थांचे [वस्तुंचे]
ठिकाणी वेगानें गमन करणार्‍या त्या इंद्रियांचा सर्व प्रकारे
रोध करून रहावे म्हणजे त्याची बुद्धि स्थिर होते, ६७.


ममताहंकृती त्यक्त्वा सर्वान्कामांश्च यस्त्यजेत् ।
नित्यं ज्ञानरतो भूत्वा ज्ञानान्मुक्तिं स यास्यति ॥ ६८ ॥
ममत्व [हे माझे ते माझे अशी बुद्धि] आणि अहंकार
[मी अमुक करीन, तमुक करीन असा अभिमान] टाकून
जो सर्व इच्छांचा त्याग करतो तो सतत ज्ञानाचे ठिकाणी
रत होत्साता ज्ञानाचे योगाने मुक्तीप्रत जातो. ६८.


एवं ब्रह्मधियं भूप यो विजानाति दैवतः ।
तुर्यामवस्थां प्राप्यापि जीवन्मुक्तिं प्रयास्यति ॥ ६९ ॥
हे राजा, याप्रमाणे जो दैवयोगानें ब्रह्मज्ञान [=ब्रह्मबुद्धि ]
जाणतो तो तुर्यावस्थेला पोंचून जीवन्मुक्ति पावतो.
या देहामध्ये जिवंत असतां मोक्षाचा अधिकारी होतो. ६९.


इति श्रीम गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु
योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे
गजाननवरेण्यसंवादे सांख्यसारार्थयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥
पहिला अध्याय समाप्त

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )