Gurudev

Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||

||गुरुगीता(श्री समर्थ रामदास स्वामी - मराठी) ||

श्रीगणेशाय नमः
।। अथ गुरूगीता प्रारंभ ।।

कोणे एके अवसरी । रम्य कैलास शिखरी ।
परोपकारास्तव सुरी । महादेवाप्रती पुसे ।।१।।

पार्वती म्हणे गा शंकरा । शिवा सद्गुरू परमेश्वरा ।
गुरूदीक्षा कृपासागरा । द्यावी मज ॥२॥

कवण उपाय सदाशिवा । ब्रह्मप्राप्ती होय जीवा ।
नमो तुज देवाधिदेवा । म्हणुनी चरणी लागली ।।३।।

मग कृपेचा सागरू । बोलता जाला शंकरू ।
अहो तू माझाचि अवतारू । वेगळीक नाही ।।४।।

लोकोपकारा कारणें । हेचि तुझें बोलणें ।
पूर्वि ऐसे कवणें । पुसिलें नाही ।।५।।

दुर्लभ हे त्रिभुवनीं । ते सांगोन वो भवानी ।
सद्गुरूविण तत्त्व कोणी । थोर नसे ॥६॥

वेदशास्त्रेपुराणें । इतिहास मंत्र पठणें ।
नाना विद्या कलापूर्ण । उच्चाटणादिक ।।७।।

शिवमत विष्णुमत । सौर गाणेश आणि शाक्त ।
अपभ्रंश निश्चित । समस्तां जीवा ।।८।।

गुरूप्राप्तीलागी कांते । सर्व करावी सुकृते ।
म्हणोनि लागावें भक्तिपंथें । सद्गुरूचिया ।।९।।

जय जया भक्तराजा । अखंड करावी गुरूपूजा ।
देव आणि गुरू दुजा । विकल्प न धरावा ।।१०॥

देव तैसाच गुरू । नाही तयाहूनि थोरू ।
ऐसा जयाचा निर्धारू । त्यासी पावे सकल सिद्धी ।।११॥

गुकार तो तम अक्षर जाण । रूकार तो तेजप्रकाशन ।
नाशक अज्ञानाचा होय ज्ञान । ऐसी दोनी अक्षरे ।।१२।।

ज्या गुरूचे चरण । त्रिविधता निवारण ।
भवसिंधूचे तारण । गुरूचे चरण दोन्ही ।।१३।।

यज्ञदान तपतीर्थ । गुरूप्राप्तीलागी करीत ।
हे न जाणती निश्चित । ते मूढ जाणावे ।।१४।।

याकारणें मुनीजनीं । स्वहित विचारूनि मनीं ।
बुद्धी ठेवावी चरणीं । गुरूदेवाचिया ।।१५।।

दुर्घट हे विष्णुमाया । जग हे मोहिले जिया ।
होता सद्गुरूचा उदयां । सर्व निरसे ।।१६।।

जीव ब्रह्मचि होये । सत्य हे बोलणे आहे ।
सर्वही पापताप जाये । सद्गुरूचेनि योगें ॥१७॥

गुरूचे चरणतीर्थासी जो गेला । तो सकळ तीर्था न्हाला ।
कृतकृतार्थ जाला । भक्तराज तो ॥१८॥

सकळ पापांचे दहन । आज्ञानाचे उन्मूलन ।
भवसिंधचे उलंघन । ते सदगरू तीर्थ ।।१९।।

तीर्थसेवने जाण । वैराग्यासहित होय ज्ञान ।
जन्मकर्म निवारण । पादोदक ॥२०॥

आधि गुरूदेव भोजन । मग घेईजे अन्नपान ।
तेचि गुरूच्छिष्ट भोजन । यथाक्रमें ॥२१॥

गुरू मूर्ति, ध्यान । करावें स्तोत्र पठण ।
गुरूचे निवासस्थान । तेचि निवास काशी ।।२२।।

गुरू चरणींचे जे जळ । ते भागीरथी केवळ ।
गुरू तो केवळ । ज्योतीलिंग ॥२३॥

गुरूचरणीं मस्तक ठेवणें । तोचि अक्षयवट जाण ।
प्रयागतीर्थ राजग्रहण । ते चिन्मयमूर्ति ॥२४।।

गुरू मूर्तिचे स्मरण । निरंतर तेची ध्यान ।
गुरू आज्ञेचे पालन । अनन्यभावें ॥२५॥

गुरूमुखि ब्रह्म असे । भक्त पावती अनायासें ।
व्यभिचारणीचे चित्त जैसे । परपुरुषीं ।।२६।।

ऐसी आवडी अशक्तां । सांडोनी जाती कुळदेवता ।
कीर्ति पुष्टि चिता । नाठवे गुरूविण ॥२७॥

अनन्यभावे करी भजन । तया माझे पद निरंजन ।
सुलभ होय जाण । गुरूरूप ॥२८॥

पार्वती म्हणे तुम्ही ऐकणे । गुरू भजावा नानाप्रयत्ने ।
गुरूमुखे विद्या पढणें । प्रसादें गुरूचिया ।।२९।।

त्रिलोकी थोर थोर । देव पन्नग असुर ।
ऋषी मानव विद्याधर । गुरूप्रसादची पावले ।।३०।।

गुकार ते प्रथम अक्षर । तेचि माया त्रिगुणाकार ।
रूकार तें ब्रह्माक्षर । माया नाशक ॥३१॥

ऐसें गुरूपद श्रेष्ठ । देवां प्राप्त होतां कष्ट ।
हाहाहुहुँ गंधर्व श्रेष्ठ । तेही पुजूं धांवति ॥३२॥

निश्चयें निरूते जाण । समस्त पुज्य गुरूभजन ।
गुरू वेगळे तत्वज्ञान । नसे परत्रयीं ॥३३॥

आसन शयन वाहन । वस्त्रे अलंकारभूषण ।
साधकें करावे निवेदन । जेणें गुरू संतोषे ।।३४।।

आपुलें जें जीवित । धनदारा सकळ वित्त ।
देह प्राणादि समस्त । करावें निवेदन ।।३५॥

शरिरदेह विचारितां । कृमिकीट दुर्गंधता ।
मलमूत्र श्लेष्मता । पार नाही ॥३६॥

अस्थी मांसाचा गोळा । आठविता वाटे कंटाळा ।
गुरू भजने सार्थक जाला । तरीच बरवे ।।३७।।

सांडुनि लाज लौकिकाची । नमस्कारा सद्गुरूची ।
काया वाचा मनाची । एकनिष्ठा ॥३८॥

संसार वृक्षी वेंधले । पतना लागी जैसे नुगलें ।
नरक सागरापासुनि रक्षिलें । सद्गुरू कृपावंतें ॥३९।।

ब्रह्मा विष्णु महेश्वर । हेहि गुरूचे अवतार ।
गुरू सर्वहि चराचर । परब्रह्म अंश ।।४०।।

अज्ञाननेत्र लागले । ज्ञान शलाकें उघडिलें ।
तया गुरूची पाऊले । देखिली म्यां ।।४१।।

व्योमातीत अखंड । मंडळाकार निबिड ।
व्यापुनी सकळ ब्रह्मांड । भरलेचि असे ॥४२॥

सकल श्रृतीचे रत्नभूषण । गुरूपद कमळ जाण ।
वेदांत अंबुज उत्फुल्लन । सूर्यचि जैसा ॥४३॥

तया माझेंचि मन । तारी जयाचे स्मरण ।
उपजो लागे ज्ञान । सपदे सहित ।।४४।।

चैतन्य सशांत । पूर्ण निरंजन व्योमातीत ।
नादबिंदुकलारहित । अगोचर जें ।।४५।।

स्थावर जंगम चराचर । व्योमातीत निराकार ।
नमन माझें निरंतर । तया श्रीगुरूते ।।४६।।

ज्ञानशक्ती आरूढला । तत्त्व विभूषणें शोभला ।
ब्रह्मांड मानी गगनमाळा । शोभती तया ॥४७।।

भुक्तमुक्तीचा दाता । अनेक कर्मबंध छेदिता ।
जीव ज्ञान प्रभावता । तारी स्ववें ॥४८।।

भवसिंधूचे शोषण । करिते जैसे संदिपन ।
गुरूतिर्थाचे महिमान । कर्ण जाणे ।।४९।।

गुरूविण आणिक । तत्त्व नसे तारक ।
तप अनुष्ठानादिक । गुरूच सर्व ।।५।।

जो माझा स्वामी गुरूनाथ । तोचि सर्व जगाचा निश्चित ।
सर्वात्मा विश्वनाथ । गुरूच सर्व ॥५१॥

ध्यानमूळ गुरूमूर्ति । पूजामूळ गुरूचरण असती ।
मंत्रमूळ वाक्यस्थिती । मोक्षमूळ गुरूकृपा ।।५२।।

गुरू आदि अनादि । गुरूच सर्व देत बुद्धि ।
गुरूच विधान विधी । जपजाप्य ॥५३॥

ब्रह्मांडी तीर्थे असती । सर्व सागरी मिळती ।
तीही सरी न पावती । गुरूचे चरणकमल तुल्य ।।५४।।

सहस्त्रांसे करून । तीर्थे न परती जाण ।
ब्रह्माविष्णु इशान । सर्वही जे जे ॥५५।।

गुरूच सर्व अंशें । जगदाकार तोचि दिसे ।
म्हणोनि निश्चळ मानसें । तोचि भजावा ।।५६।।

ज्ञानविज्ञान सहित । गुरूभजनें प्राप्त होत ।
ते नि:शब्दें गर्जत । श्रुती स्वयें ।।५७।।

गुरूप्रसादें करून । देवगंधर्व पितृगण ।
यक्षसिद्ध चारण । ईश्वरादिक ।।५८।।

सर्वही आपुले ठाई । परी भक्तीची गरज नाही ।
गुरूप्रसादे विजयी । ठाऊके नसे ।।५९।।

अहंकार गर्वे करून । संसार कुहरी आगमन ।
विद्यात बळें जाण । निमग्न असे ॥६०।।

गंधर्व देव पितर । सिद्ध चारण यक्ष किन्नर ।
सुटका न पावती नर । याचि लागीं ॥६१॥

गुरूसेवा नेणती । म्हणुनीच यातायाती ।
असो आतां पार्वती । ध्यान ऐक ॥६२।।

जे ऐकतां गुरूध्यान । परमानंद पावे मन ।
संसार दुःख गहन । नसे सर्वथा ॥६३।।

भक्तिमुक्ति कारण । सकळ सुखाचें निधान ।
श्रवणमात्रे पावन । करी रोकडे ।।६४।।

श्रीमंत गुरू हेचि वचन । ब्रह्म हेचि भजन ।
तयातें विस्मरण । नमन करी सत्य ।।६५।।

ब्रह्मानंद मूर्ति । परम सुखाची प्राप्ती ।
सुखदुःखाची शांती । अनोपम ।।६६।।

अचळ अमळ गुण रहित । सर्व बुद्धीत साक्षभूत ।
भावाभावविगत । नमन तया ॥६७।।

हृदय कमळाभितरी । पाकोळी कांचे उपरी ।
मध्ये सिंव्हासनावरी । दिव्यमूर्ती ॥६८।।

शुद्ध चंद्रकळा । पुस्तक हस्ते शोभला ।
वरदायकाची लीला । पाहिजे ऐसे ॥६९।।

आनंदें करू दर्शन । ज्ञानस्वरूप प्रसन्न ।
बोधरूपें पावन । कृपामूर्ती ॥७०।।

नित्य शुद्ध निरंजन । निराभास विकारवहन ।
नित्यबोध चिदानंदघन । गुरूवेद ऐसा ॥७१।।

शुभ्रवस्त्रे परी वारला । श्वेतपुष्पे मुक्तमाळा ।
उपमा नाही नेत्रकमळा । वामांगी निजशक्ति ।।७२।।

योगी स्तविती जया । अमृत केवळ भवरोगियां ।
श्रृती आणिलीया । निग्रहानुग्रहातें ॥७३॥

ऐसा पंचविधार्ता । द्विभुज श्वेतकमळधर्ता ।
ध्यानपूर्वक नाम स्मरतां । प्रात:काळी ।।७४।।

त्या गुरूचे चरण । सदा ध्यानी असावे जाण ।
महादोष निर्दाळण । स्वयें करिसी ॥७५।।

गुरूहुनि अधिक । त्रिवाचा नसे आणिक ।
शिवजीव ही आज्ञाधारक । हेचि उपदेश ॥७६।।

हेचि कल्याणी जाण । त्रिवाचा माझे सिंहासन ।
ऐसें करिता भजन । ज्ञान उपजे स्वयें ।।७७।।

मग मी मुक्त ही भावना । शिष्य करावे वाटे मना ।
दाविले मार्ग अंत:करणा । शुद्ध करावे ।।७८।।

अनित्य ते सर्व निरसावे । सत्य तें साह्य व्हावें ।
ज्ञान अज्ञान स्वभावें । समस्ती कीजे ।।७९॥

ऐसें असतां पार्वती । गुरू निंदा जे करिती ।
ते घोर नरकी पावती । यावत् चंद्र सूर्य ।।८०॥

जंववरि देही वर्तत । तवंवरि गुरू भजावा समर्थ ।
गुरूचा जो लोभ भक्त । न करिती जनीं ॥८१।।

स्वच्छंदी जरी जाला । गुरू वंद्यचि तयाला ।
हुंकार सन्मुख बोला । उधट न बोलावे ।।८२।।

असत्य बोलणें गुरूसी । अहंकार यावा दासी ।
गुरूतें गोवीं परियेसी । जाण निज बळें ।।८३।।

निर्जळ स्थळी तो पुरुष । चिरकाळ होय ब्रह्मराक्षस ।
मग अंती पावे तामस । योनी नाना ।।८४।।

मुनी यांचा शाप जाला । देवपन्नगीं त्रासिला ।
गुरू रक्षी तयाला । काळ मृत्यु भयापासुनि ।।८५।।

आणि गुरूचा जो श्रापिला । कवण ही न रक्षी तयाला
ईश्वरही परी जाला । अशक्त तेथें ॥८६॥

गुरूमंत्र रोज स्मरण । वेद वाक्यासमान ।
केवळ जे गुरूजन । श्रुति स्मृति आगळे ॥८७।।

तोचि जाणावा संन्यासी । विनटला गुरूदास्यासी ।
इतर मिरवी वेषासी । ते न म्हणावे योगी ॥८८।।

जैसे सर्वत्र निर्विकार । परब्रह्म व्यापक अक्षर ।
तेचि गुरूचे साचार । देह मानावें ॥८९।।

गुरूकृपेने आत्माराम । लाभ होय परम ।
स्वता ज्ञानाचा आगम । ते सद्गुरू कृपा ।।९०॥

आब्रह्मापासूनि जाण । जीव जे जे अणुप्रमाण ।
स्थावर जंगम संपूर्ण । गुरूच होय ॥९१।।

सच्चिदानंद सदोदित । निर्गुण निरंजन आणि सत ।
परात्पर देह समस्त । नमू तयां ।।९२।।

हृदयाकाशी निर्मळ । स्फटिक जैसा सोज्वळ ।
की दर्पणीचे केवळ । झळफळिले ।।९३।।

अंगुष्ट मात्र प्रमाण । जें करावें ध्यान ।
चिन्मय स्फुरण । भवरूप ।।९४॥

मग सांडोनि तें स्फुरण । निर्विकल्प करावें मन ।
अगोचर में निरंजन । तें चि ध्यावें ।।९५॥

निज स्वभावें कपुर । शितोष्णाहुनी परंपर ।
की कुंकुम रंगाकार । ब्रह्म जैसे ।।९६॥

आपण तैसेचि व्हावे । एकत्रई च असावें ।
,गी कीटकन्यायें ध्यावें । रूप श्रीगुरूचें ॥९७।।

गुरू ध्यान जाण पाहे । प्रिय भक्त तैसें आहे ।
पिंडी पदी रूप होय । नासती संशयो ॥१८॥

स्वयें तैसेचि होऊनी जाण । तैसेच पाहे सर्व ज्ञान ।
निराळे जै गगन । सर्वत्र पै ।।९९।।

एकाएकी शांत । निर्वासना संग रहित ।
यथा लाभ संतुष्ट चित्त । असावें सर्वदा ।।१०।।

स्वल्प अथवा बहुत । यथा प्राप्त संतुष्ट चित्त ।
नि:कामना भरीत । सर्वदा पै ।।१०१।।

ऐसा जो गुरूचा दास । सर्वत्र सर्वदा उदास ।
वसे तो पुण्य देस । जनसीं ।।१०२।।

ऐसी मुक्तांची लक्षणें । म्यां निरोपिली तुज कारणे ।
उपदेश मागें येणें । गुरू ध्यानादिका ।।१०३॥

येणें उपदेशे पार्वती । लोक परोपकार निश्चिती ।
दंभ अभिमाने कर्मी बुडती । सर्व जन ।।१०४।।

असे हे पुण्य आख्यान । जे जन पठती करिती श्रवण ।
लेववून देती दान । ब्राह्मणासी ।।१०५॥

त्या सकळ दानाचे फळ । भवव्याधी होती निर्मळ ।
मंत्रराज केवळ । सरी न पावती येर ।।१०६।।

अनंत फळ अन्नदानाचे । सर्व पाप हरे साचे ।
राक्षस भुवन निर्दाळणाचे । व्याघ्रचोरादिका ॥१०७॥

सकळ विघ्ने दूर करी । अष्ट सिद्धी आणी घरी ।
तो सद्गुरू निर्धारी । सर्व काळ स्मरावा ॥१०८॥

महाव्याधी नासती । मंत्रोनि लाविता विभूती ।
राजे वश्य होती । नासती शत्रू ।।१०९।।

शासनी सर्वासनीं । अथवा शुभ्र कमळासनीं ।
निष्काम हे भवानी । जपावी गीता ॥११०।।

अरिष्ट निवारण रक्तासन । शत्रु नाश कंबलासन ।
धनालागी पीत वर्ण । घालावे पै ।।१११॥

उत्तर मुखे अरिष्ट निरसन । पूर्वे शत्रू वश्यी कर्ण ।
दक्षिणे शत्रु मरण । पश्चिमे धन साध्य ।।११२।।

पश्चिमे सकळ भूतमोहन । राजभुवनीं तुटे बंधन ।
देवादिदेव राजे जन । वश होती ।।११३।।

चाडाचे मुख्य बंधन । कार्य नव्हे ते होय जाण ।
गुणाचे विवर्धन । नाशक दुष्ट कर्मा ।।११४।।

दष्ट ग्रह निवारी । दुष्ट स्वप्न नाश करी ।
सभाग्य होय नारी । भावें भजतां ।।११५।।

आरोग्य कर आयुष्य कर । पुत्रनातु वृद्धीकर ।
निष्काम मोक्षकर । होय भक्त ।।११६।।

वंध्यालागी पुत्र होती । काम धन ही पावती ।
चिंतामणी गुरू भक्ती । ऐसें जाले ।।११७।।

काम मोक्षदायक । सकाम पूर्ण प्राप्तक ।
शिवविष्णुचे भक्त । सौरगाणेशादिक ।।११८।।

सकळ हे गीता । फळ पाविजें पढतां ।
स्थाने सांगो आता । अनुष्ठानाची ।।११९।।

सागरी सरिता तिर्थी । हरिहर देवालय शक्ति ।
गोठणी अथवा जेथे यती । वास करिती ॥१२०॥

वटतळी अथवा आवळी । वृंदावनी अथवा तुळसी जवळी ।
प्रत्येक अवत्थ स्थळी । एकाग्र मनें ।।१२१॥

ही निकामी स्थाने । आतां सकामाची ऐकणें ।
भयस्थळ स्मशानें । धत्तुर आंबा ।।१२२।।

मुर्ख असतां नर । हे जपती ते पवित्र ।
भला तैसा गुरूपुत्र । तो हि श्रेष्ठ होईल ।।१२३।।

संसार मुळ नाशन । गुरूगीता जळ हे जाण ।
पुढती उपजची ज्ञान । नाही संशयो ।।१२४।।

ऐसा जो भक्तराज । तो चि संत पवित्र सहज ।
देवरूपी तीर्था बुज । तये स्थळी ।।१२५।।

तो असता आसनीं । शयनी अथवा भोजनीं ।
अश्वराज आरूढोनि । चाले सुखें ॥१२६।।

सदा शुची जाणावा । दर्शने त्याच्या मोक्ष व्हावा ।
त्यांत आणि सावा । भेदचि नाही ॥१२७॥

जळ जळी मिळाले । घटी आटी नभ संचलें ।
जैसे जीव शिव एक जाले । भेदरहित ॥१२८॥

ऐसा जो मुक्त नर । भावें भजावा ईश्वर ।
दान सेवा उपचार । करावा प्रयत्नें ॥१२९।।

संतोषे जे बोले । ते सत्य होऊनी फळे ।
भोग मोक्ष आथिले । जीवाग्रे पै ।।१३०॥

ऐसे गुरूगीतेचे महिमान । सरी न पाविजे अन्य ।
धन्य धन्य ते जन । तो धन्य दास ही ।।१३१।।

गुरू माता गुरू पिता । गुरू देव स्वजन भ्राता ।
कोटी पुण्य संतोषता । गुरू देवाचिया ॥१३२।।

विद्याधन गर्वित । गुरूतें जे न मानित ।
ते येमपुरीचे अंकीत । जाणावे करंटे ॥१३३।।

म्हणुनी गुरू ईश्वर । हाचि सत्य निर्धार ।
बहु बोलणे पसर । काज नाही ।।१३४।।

जीवन् मुक्तांची लक्षणे । साक्षपे ऐके वरानने ।
तयासि मुक्त म्हणणें । येर ते बद्ध ।।१३५।।

शांत सर्वदा सुशील । अंतर ज्यांचे कोमळ ।
दयावंत पुण्यशील । स्वधर्म न टाकिती ॥१३६॥

ईश्वर वर्णिता भागले । अनादि तया धर्म लाविले ।
ते जेणे टाकिलें । आपुले मते ।।१३७।।

तो अपराधी देवाचा । मूर्ख अल्पमतीचा ।
अंश न कळे देवाचा । पामरता ।।१३८।।

म्हणोनि संत भले । जाणोनि अंतरि निवाले ।
स्वधर्माचे पेंडाळे । रक्षिलें जिही ।।१३९।।

सुवर्ण आणि तृण । मृत्तिका लोष्ट पाषाण ।
शत्रु मित्र संपूर्ण । सारिखें जया ॥१४०॥

अहंकार नसे देहीं । उग्र पाप नसे हृदयीं ।
हेचि पार्वती पाहीं । जाणावे मुक्त जाले ।।१४१।।

हे गुह्य जाणें । अभक्तांते न सांगणें ।
स्वामीकार्तिक वरानने । पुत्र माझा ।।१४२॥

गणेश आदि आत्मज । तयातें हे सांगे न गुज ।
भक्तातें त सहज । प्रगट करिसी ।।१४३।।

अभक्त क्रोधी कपटी । करणीविण करी चावटी ।
चुरहटी । पाखंडी जो ।।१४४॥

पुण्यपाप नाही म्हणून । स्वार्थ नाही सुटणे ।
तो नास्तिक जाण । भरवशाने ।।१४५॥

याप्रति हे गीता । तुवा न करावी वार्ता ।
मन करोनियां तत्त्वता । न बोलावे त्वां ।।१४६।।

जितेंद्रिये आणि शांत । विरक्त चिन्हें अलंकृत ।
तयातेची क्वचित । उपदेशावी ॥१४७।।

संस्कृत ते व्यासवाणी । शिवे उपदेसीली भवानी ।
तेचि प्रेम धरूनि । महाराष्ट्रभाषा ।।१४८।।

बोलिले वेदसार । ऐका श्रोते चतुर ।
दास विनवी निरंतर । चित्तीं धरूनी ।।१४९।।

इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखंडे उमामहेश्वरसंवादे ।
गुरूगीतास्तोत्र संपूर्णम् । सद्गुरूनाथार्पणमस्तु ।

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||

Download pdf Back